19 दिवसांची सघन मोहीम; 1,780 पाणी नमुन्यांची तपासणी; सर्व नमुने समाधानकारक नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विभागातील पाणी गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा अधिक बळकट केली आहे. सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, दिनांक 03 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2026 या कालावधीत रेल्वे स्थानके व रेल्वे परिसरात 19 दिवसांची सघन पाणी गुणवत्ता निरीक्षण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रेल्वे स्थानके व रेल्वे वसाहतींमधील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये महानगरपालिका/स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होणारा पाणीपुरवठा, पाणी साठवणूक, क्लोरीनेशन तसेच पाणी वितरण व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. पाण्याची गुणवत्ता आणि अवशिष्ट क्लोरीनच्या पातळीचे नियमित निरीक्षण करण्यासोबतच, निर्धारित प्रक्रियेनुसार E. coli दूषिततेचा शोध घेण्यासाठी जीवाणूविषयक तपासणी करून निरीक्षण यंत्रणा अधिक प्रभावी करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नांदेड विभागातील 09 आरोग्य निरीक्षकांनी विविध रेल्वे स्थानके व रेल्वे परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था, पाण्याचे स्रोत आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची सविस्तर तपासणी केली. मोहिमेदरम्यान एकूण 1,780 पाण्याचे नमुने संकलित करून त्यांची तपासणी करण्यात आली. तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांचा तपशील : * अवशिष्ट क्लोरीन तपासणी: 1,674 नमुने * जीवाणूविषयक तपासणी: 94 नमुने * रासायनिक तपासणी: 12 नमुने * एकूण तपासण्यात आलेले नमुने: 1,780 नमुने अवशिष्ट क्लोरीनची पातळी तसेच जीवाणूविषयक गुणवत्ता तपासण्यासाठी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये संभाव्य E. coli दूषिततेची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार रासायनिक तपासणीदेखील करण्यात आली. या सघन तपासणी व परीक्षण मोहिमेचे निष्कर्ष समाधानकारक राहिले असून, तपासण्यात आलेले सर्व 1,780 नमुने पिण्यासाठी व प्रवाशांच्या वापरासाठी योग्य आढळून आले. कोणताही नमुना अयोग्य आढळला नाही तसेच मोहिमेदरम्यान E. coli पॉझिटिव्ह नमुना आढळून आला नाही. या मोहिमेत रेल्वे स्थानके आणि इतर रेल्वे परिसरातील पाण्याचे स्रोत, पाणी साठवणूक सुविधा, वितरण व्यवस्था तसेच क्लोरीनेशन प्रणालीच्या निरीक्षणाचाही समावेश करण्यात आला. नांदेड विभागाचा वैद्यकीय विभाग पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवत असून, पाण्याच्या नमुन्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. अवशिष्ट क्लोरीनच्या पातळीचे नियमित निरीक्षण केले जाते, तर आवश्यकतेनुसार आणि निर्धारित प्रक्रियेनुसार जीवाणूविषयक तसेच रासायनिक तपासणी करण्यात येते. सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, जलजन्य आजारांना प्रतिबंध करणे तसेच प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. रेल्वे परिसरात निर्धारित मानके कायम राखण्यासाठी नांदेड विभागाकडून पाणी गुणवत्तेचे नियमित तसेच सघन निरीक्षण यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 94 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्ह्यास २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान येलो अलर्ट