देगलूर (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्याविरोधात शिवसेनेच्याच महिला पदाधिकाऱ्याने पोलिसांत धाव घेतली आहे. शिधावाटप कार्यक्रमादरम्यान जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला आहे. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याने नांदेड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील खानापूर येथील लक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालयात ७ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने गरीब नागरिकांसाठी शिधावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख मिराबाई गंगाधर तमलूरकर उपस्थित होत्या. याच कार्यक्रमादरम्यान वाद निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी जातीचा उल्लेख करून अपमानास्पद शिवीगाळ केली. तसेच केस ओढून मारहाण केल्याचा आरोप मिराबाई तमलूरकर यांनी केला आहे. पती बचावासाठी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय व्यंकट पाटील खतगावकर, उमेश मुंडे आणि डॉ. व्यंकट धुमाळे यांनीही जातिवाचक शिवीगाळ करुन अपमानित केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. यावेळी उमाकांत पाटील, सायलू गायकवाड, राजेंद्र गोपड आणि साहेबराव नटकर यांनी मध्यस्थी करून आपली सुटका केल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेनेच्याच महिला पदाधिकाऱ्याने उपमुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांविरोधात गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मिराबाई तमलूरकर यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीवर देगलूर पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, तसेच आरोप करण्यात आलेल्या व्यक्ती यावर काय भूमिका मांडतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तक्रारीतील आरोपांची अधिकृत पडताळणी आणि पोलिसांच्या पुढील कारवाईनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 176 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मोदींना प्रश्न विचारला अन् व्हिसा कापला? नॉर्वेच्या पत्रकाराचा अमित शाहंवर थेट घणाघात