गुलालाला फाटा, फुलांच्या वर्षावातून भक्तीचा गजर!

औसा (प्रतिनिधी)  – गुलालाची धूळ नाही, आरोग्याची हानी नाही आणि पर्यावरणाचा ऱ्हास नाही… चोहीकडे केवळ सुवासिक फुलांचा वर्षाव आणि गणरायाच्या भक्तीचा गजर! लातूर जिल्ह्यातील औसा शहराने गेल्या २४ वर्षांपासून जपलेली ‘गुलालमुक्त गणेशोत्सव’ परंपरा आज सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यविषयक जागृतीचा अत्यंत प्रशंसनीय आदर्श ठरली आहे.

सन २००३ पासून औसा शहरातील गणेश मंडळे, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत गणेशोत्सवातील रासायनिक गुलालाला पूर्णपणे फाटा देण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी गणरायाच्या आगमनापासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत सुवासिक फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्याची परंपरा सुरू करण्यात आली. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ औसावासीयांनी ही परंपरा केवळ जपलीच नाही, तर ती अधिक व्यापक आणि प्रेरणादायी केली आहे.

रासायनिक गुलालातील काही घटकांमुळे डोळे, त्वचा आणि श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणातील गुलालामुळे हवा आणि परिसराच्या स्वच्छतेवरही परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर औसाने भक्ती आणि उत्सवाचा आनंद कायम ठेवत आरोग्यपूरक आणि पर्यावरणस्नेही उत्सवाची वाट निवडली आहे.

सर्व २८ मंडळांची गुलालमुक्त परंपरेला साथ

औसा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी गेल्या २४ वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्याची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. यंदाही शहरातील २८ गणेश मंडळांनी ही परंपरा कायम राखत सामाजिक सलोखा, एकोपा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजाला एकत्र आणणारा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा उत्सव व्हावा, या उद्देशाने औसातील मंडळांनी घेतलेला हा निर्णय विशेष उल्लेखनीय ठरतो. धार्मिक सहिष्णुता, सामाजिक एकात्मता आणि शांततामय उत्सवाची परंपरा जोपासण्यात या मंडळांचे योगदान महत्त्वाचे आहे.

२५ सप्टेंबर रोजी २८ मंडळांचा गौरव

या उल्लेखनीय आणि अनुकरणीय उपक्रमाची दखल घेत २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता, औसा शहरातील विसर्जन मिरवणूक सुरू होण्यापूर्वी या २८ गणेश मंडळांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक  मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक रेवणनाथ डमाळे तसेच औसा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक कालिदास सूर्यवंशी यांची उपस्थिती राहणार आहे.

गुलालाऐवजी फुले, धुराऐवजी सुगंध आणि दिखाव्याऐवजी सामाजिक बांधिलकी असा संदेश देणारी औशाची ही परंपरा उत्सव साजरा करण्यासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारीही अधोरेखित करते. त्यामुळे २४ वर्षांची ही गुलालमुक्त परंपरा औसाच्या सामाजिक जाणीवेचा आणि एकोप्याचा अभिमानास्पद ठेवा ठरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!