खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

 

१२ तासांची ड्युटी, अपुऱ्या सुट्ट्या, कौटुंबिक संघर्ष आणि वरिष्ठांचा दबाव; समाजाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी कोणाची?

नांदेड (प्रतिनिधी) – समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र रस्त्यावर उभा असलेला पोलिस आपल्याला नेहमी खाकी वर्दीत दिसतो. त्याच्या हातात कायद्याची ताकद असते; चेहऱ्यावर कर्तव्याची कठोरता असते. मात्र त्या वर्दीच्या आत धडधडणारे हृदय, कुटुंबाची ओढ, शरीराचा थकवा आणि मनावर साचणारा ताण अनेकदा कुणाच्याच नजरेत येत नाही. पोलिसांचे कामाचे तास, रजा, कौटुंबिक जीवन, अंतर्गत संघर्ष आणि वरिष्ठ-कनिष्ठ संबंध यांचा विचार केला तर पोलिस दलासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांची गंभीरता लक्षात येते.

सुट्ट्यांच्या कागदावरून वास्तवाच्या रस्त्यावर

वृत्तांतातील आकडेवारीनुसार, इतर शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षभरातील विविध सुट्ट्या आणि रजा मिळून सुमारे १६० दिवसांचा विश्रांतीचा कालावधी उपलब्ध होतो. रविवार, शनिवार, सणांच्या सुट्ट्या, आजारी रजा, किरकोळ रजा आणि अर्जित रजा यांचा त्यात समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. २० दिवस किरकोळ आणि १५ दिवस अर्जित रजा मिळत असतात. साप्ताहिक सुट्टी अनेकदा  कागदावर असली तरी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती, बंदोबस्त किंवा अन्य तातडीच्या कामांमुळे ती प्रत्यक्षात मिळेलच, असे नाही. ही केवळ सुट्टीची बाब नाही. हा पोलिसांच्या विश्रांतीच्या अधिकाराचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे.

१२ तासांची ड्युटी : शरीर थकते, मनही थकते

वृत्तांतानुसार इतर शासकीय कर्मचारी वर्षातील सुमारे २०५ दिवस, दररोज आठ तास काम करतात. म्हणजे त्यांचे वार्षिक कामाचे तास सुमारे १,६४० होतात. पोलिसांच्या बाबतीत मात्र सुमारे ३०६ दिवस काम आणि दररोज किमान १२ तास कर्तव्य असा उल्लेख आहे.

गणित सोपे आहे 

३०६ दिवस × १२ तास = ३,६७२ तास. म्हणजेच या तुलनेनुसार पोलिसांचे वार्षिक कामाचे तास इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत दुप्पटपेक्षा अधिक आहेत. याचा परिणाम केवळ शरीरावर होत नाही. पुरेशी झोप न मिळणे, व्यायामासाठी वेळ नसणे, कुटुंबासाठी वेळ कमी होणे आणि सततच्या तणावपूर्ण वातावरणात काम करणे याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो.

ड्युटी संपते; पण पोलिसांचा ताण संपतो का?

पोलिसांच्या समस्या केवळ ड्युटीच्या वेळेत मर्यादित राहत नाहीत. त्या घरापर्यंत पोहोचतात. पोलिस दलातील २६ टक्के गृहकलहाचा अडकलेले असतात.  सणासुदीला घरात नसणे, मुलांना वेळ न देणे, अनियमित ड्युटी आणि सततचा मानसिक दबाव यामुळे कौटुंबिक संबंधांवर ताण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातच पोलिस दलातील अंतर्गत स्पर्धा आणि एकमेकांविरोधातील तक्रारी किंवा लावालावी हा आणखी एक तणावाचा मुद्दा आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक तक्रारीकडे संशयाने पाहण्याऐवजी वरिष्ठांनी तथ्य तपासून, दोन्ही बाजू ऐकून आणि निष्पक्षपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला कुणी समजून घेत नाही ही भावना कर्मचाऱ्यांच्या मनात अधिक खोलवर जाऊ शकते.

वरिष्ठांचा दबाव आणि कनिष्ठांची कोंडी

पोलिस दलातील वरिष्ठ-कनिष्ठ संबंध हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. आदेशांची साखळी आवश्यक असली तरी त्यासोबत संवाद आणि मानवी दृष्टिकोनही आवश्यक आहे.पोलिस कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रमाणाबाबत अनुक्रमे १२ टक्के आणि ६ टक्के असे आकडे आहेत.

वरिष्ठांकडून कनिष्ठांवर येणारा कामाचा दबाव, सततची जबाबदारी आणि चुका झाल्यास होणारी कारवाई यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीत काही कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीचा विचार करतात.शिस्त आवश्यक आहे; पण शिस्त आणि मानसिक दडपण यात फरक आहे.

निरा गावचा धडा : पोलिसांचा धाक नव्हे, विश्वास जिंकला पाहिजे

पोलिस दलाचे केवळ नकारात्मक चित्र पाहणे योग्य ठरणार नाही. बारामती तालुक्यातील निरा गावातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा ३६ वर्षांच्या सेवाकाळाचा प्रेरणादायी आहे. आंदोलने, मोर्चे, बंद किंवा धार्मिक वाद अशा परिस्थितीत त्यांनी संवादातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परिणामी, पोलिस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले. त्यांची बदली होण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनीच बदली रद्द करण्यासाठी आंदोलन केली आज ते पोलीस अंमलदार सहायक पोलीस उप निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, पोलिसांचा धाक निर्माण करणे सोपे आहे; पण पोलिसांवर विश्वास ठेवणारा समाज निर्माण करणे ही खरी कामगिरी आहे. निरा गावात कोणत्याही जाती किंवा धर्माच्या कुटुंबात लग्न किंवा इतर कोणतेही मंगल कार्य असेल, तर त्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेषक म्हणून सर्वात पहिले नाव या लाडक्या पोलिसाचे असायचे.

आपत्तीच्या काळात खाकी ठरते देवदूत

पूर किंवा अन्य आपत्तीच्या काळात पोलिसांची मानवी बाजू अधिक ठळकपणे समोर येते. स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवणारे पोलिस, संकटाच्या वेळी जनतेसाठी आधार बनतात. त्या क्षणी नागरिक आणि पोलिस यांच्यातील नाते कायदा अंमलबजावणी करणारा आणि नागरिक एवढेच राहत नाही. ते माणूस आणि माणूस असे नाते बनते. समाजाकडून मिळणारा हा विश्वास आणि सन्मान पोलिसांसाठी मोठी मानसिक ऊर्जा ठरू शकतो.

बदलाची सुरुवात कुठून होणार?

पोलिस दलातील ताणतणाव कमी करण्यासाठी केवळ पोलिसांनी आत्मपरीक्षण करणे पुरेसे नाही. प्रशासनालाही आत्मपरीक्षण करावे लागेल. पोलिसांचे कामाचे तास शक्य तितके शिफ्ट पद्धतीने नियंत्रित करणे, नियोजित साप्ताहिक विश्रांती आणि रजा प्रत्यक्षात उपलब्ध करून देणे, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनाची सुविधा निर्माण करणे आणि वरिष्ठ-कनिष्ठ संवाद मजबूत करणे ही काळाची गरज आहे. पोलिस ठाणे हे केवळ गुन्ह्यांच्या नोंदीचे ठिकाण नसून ते सतत तणाव हाताळणारे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे तेथील वातावरणही संवेदनशील, सहकार्याचे आणि विश्वासाचे असणे आवश्यक आहे. त्याचवेळी पोलिस कर्मचाऱ्यांनीही आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. नकारात्मक परिस्थितीला सकारात्मकतेने उत्तर देण्याऐवजी संयम, संवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे.

आता प्रश्न पोलिसांचा नाही; प्रश्न संपूर्ण व्यवस्थेचा आहे!

आपण पोलिसांकडून २४ तास कर्तव्याची अपेक्षा करतो. निवडणूक असो, मोर्चा असो, सण असो, पूर असो किंवा कायदा-सुव्यवस्थेचे संकट सर्वप्रथम धावून जाणाऱ्यांमध्ये पोलिस असतात. पण ज्यांच्याकडून समाजाच्या सुरक्षेची अपेक्षा केली जाते, त्यांच्या मानसिक आणि शारीरिक सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? खाकी वर्दी लोखंडाची नसते. त्या वर्दीच्या आतही एक माणूस असतो. (काही काही पोलीस लोखंडी पुरुष मात्र असतात ) त्याला थकवा येतो. त्याला घराची आठवण येते. त्याला मुलांसोबत वेळ घालवायचा असतो. त्यालाही सन्मानाने आणि मानसिक समाधानाने जगायचे असते. म्हणूनच पोलिसांच्या ताणतणावाचा प्रश्न हा केवळ पोलिस प्रशासनाचा विषय नाही; तो समाजाच्या सुरक्षिततेशी थेट जोडलेला प्रश्न आहे.

आरोग्य आणि निवास व्यवस्था 

पोलिसांच्या कुटुंबांच्या आरोग्यासाठी अनेक कल्याणकारी योजना उपलब्ध आहेत. परंतु, या आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अनेक प्रशासकीय अडचणी आणि तांत्रिक फेरे (फाटे) आहेत.या अडचणींमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःचे किंवा कुटुंबाचे आरोग्य बिल तयार करणे अत्यंत कठीण जाते. आरोग्य बिल तयार करण्याच्या या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेला पोलीस शेवटी कंटाळतात. कंटाळल्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी आपले हक्काचे आरोग्य बिल सादर न करता तसेच अर्धवट सोडून देतात. पोलिसांच्या आरोग्य बिलांच्या मंजुरीतील या त्रुटींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आज मोठी गरज आहे. आरोग्य सुविधांइतकीच पोलिसांच्या राहण्याच्या घरांची (वसाहतींची) स्थिती सुधारणेही आवश्यक आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या या निवासी घरांची काही काही महिन्यांच्या अंतराने नियमित तपासणी केली पाहिजे. अशा नियमित तपासणीमुळे आपले पोलीस कर्मचारी नेमके कशा अवस्थेत आणि कोणत्या परिस्थितीत राहत आहेत, हे समजेल. पोलिसांच्या या निवासस्थानांमध्ये आवश्यक मूलभूत भौतिक सुविधा उपलब्ध आहेत की नाही, हे तपासले जावे.जर पोलीस वसाहतींमध्ये भौतिक सुविधा नसतील, तर त्या मिळवून देणे गरजेचे आहे.पोलिसांना या सर्व भौतिक सुविधा मिळवून देण्याची मुख्य जबाबदारी संबंधित प्रमुखांची असते.पोलिसांच्या राहण्याच्या घरांच्या या गंभीर प्रश्नावर राज्यभरातील संबंधित घटक प्रमुखांनी त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. घटक प्रमुखांनी पोलिसांच्या घरांच्या विषयाचे गांभीर्य ओळखून त्यावर तातडीने विचार केला पाहिजे.पोलिसांच्या निवासस्थानांच्या या अत्यंत महत्त्वाच्या समस्येवर त्वरित प्रभावाने ठोस कार्यवाही करण्याची आज नितांत गरज आहे.

खाकीला फक्त आदेश नकोत; आधारही हवा.

पोलिसांना फक्त कर्तव्याची आठवण करून देण्याऐवजी त्यांच्या हक्कांचीही जाणीव ठेवावी लागेल. कारण.ज्यांच्या खांद्यावर समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांच्या खांद्यावरील ताण कमी करण्याची जबाबदारीही समाज आणि प्रशासनाचीच आहे. आणि कदाचित खाकी वर्दीला सलाम करण्याची खरी सुरुवात तेव्हाच होईल, जेव्हा आपण त्या वर्दीच्या आत उभ्या असलेल्या माणसालाही समजून घेऊ.

पोलीस विरुद्ध इतर शासकीय कर्मचारी: कामाचे तास आणि सुट्ट्यांचे तुलनात्मक कोष्टक
सुट्ट्या आणि कामाचा तपशील
इतर शासकीय कर्मचारी
पोलीस कर्मचारी
रविवारच्या सुट्ट्या
५२ दिवस (निश्चित मिळतात)
५२ दिवस (कागदावर आहेत, पण मिळतीलच याची खात्री नाही)
शनिवारच्या सुट्ट्या (दुसरा व चौथा)
२६ दिवस
सुट्टी मिळत नाही
सण व उत्सवांच्या सुट्ट्या
२४ दिवस
सुट्टी नाही (उलट सणांच्या काळात बंदोबस्ताचे अतिरिक्त काम असते)
आजारी रजा
२० दिवस
आजारी रजेवर गेल्यास वेतन मिळत नाही
किरकोळ रजा (CL)
२० दिवस
२० दिवस
मोठी किंवा अर्जित रजा (EL)
३० दिवस
१५ दिवस
संप, बंद, आपत्ती काळातील अतिरिक्त सुट्ट्या
५ ते ७ दिवस
सुट्टी नाही (या काळात २४ तास कार्यरत राहावे लागते)
एकूण सुट्ट्यांचे दिवस
१६० दिवस
अत्यंत कमी आणि अनिश्चित
वर्षभरातील प्रत्यक्ष कामाचे दिवस
२०५ दिवस
३०६ दिवस
रोजचे कामाचे तास
८ तास
किमान १२ तास
वर्षातील एकूण कामाचे तास
१,६४० तास
३,६७२ तास
कामाच्या तासांमधील तफावत
पायाभूत प्रमाण
इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत तब्बल २२४% जास्त काम
शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम
व्यायाम आणि आरोग्यासाठी पुरेसा वेळ मिळतो
सततच्या १२ तास कामामुळे व्यायाम आणि स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही
प्रवासाचा ताण आणि सुरक्षितता
कामाचे तास निश्चित असल्याने प्रवासाचा ताण कमी असतो
अत्यंत थकलेल्या अवस्थेत रोज १ तास स्वतःचे वाहन चालवून जावे लागते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!