हडको, नांदेड : २६ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते २७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान हडको येथील राजेश्वर पुरुषोत्तम रेवणवाड यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हदगाव : हदगाव येथील मै. वाळकी बु. कयादू बार रेस्टॉरंटमध्ये २६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० दरम्यान चोरट्यांनी मागील दरवाजाने प्रवेश केला. बारमधील विदेशी दारू, रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर असा ३ लाख ८७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. याबाबत शिवाजी सखाराम जिंतूरकर यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंदनगर, नांदेड : २६ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान मिलिंदनगर येथील विठ्ठलाबाई कचरू जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घर व आस्थापनांना लक्ष्य केले असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
