सातबारा नोंदीसाठी तीन हजारांची लाच घेणारा खडकी बाजाराचा तलाठी दोषी; दोन वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा

भोकर (प्रतिनिधी) –  तक्रारदाराच्या आईच्या नावे खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार घेऊन सातबारा अभिलेखात नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार सज्जाचा तत्कालीन तलाठी संजय गजानन मेहुनकर यास भोकर येथील न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि वीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल भोकर येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश मोहम्मद नासिर मोहम्मद सलीम यांनी दिला आहे.

घटना व लाचेची मागणी:
तक्रारदार विठ्ठल काशिनाथ नरखेडे, राहणार खडकी, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड यांनी आपल्या आईच्या नावे शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीचा फेरफार घेऊन सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी आरोपी तलाठी संजय गजानन मेहुनकर याने पंचांसमक्ष तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर २५ मे २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून आरोपीला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २२/२०१५ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, १३-१-ड सह १३-२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाचा निर्णय व शिक्षा:
विशेष खटला क्रमांक ०६/२०१५ ची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ३० ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने आरोपी संजय गजानन मेहुनकर यास दोषी ठरवून खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:

  • भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये: ०२ वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये द्रव्यदंड.
  • भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम १३-१-ड अन्वये: ०२ वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये द्रव्यदंड.

तपास व न्यायालयीन कामकाज:
या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गणपत सटवाजी राहिरे यांनी केला. न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक अनिता दिनकर यांनी पैरवी अधिकारी म्हणून, तर ऍड.अनुराधा डावकरे यांनी शासकीय अभियोक्ता म्हणून काम पाहिले. तसेच कोर्ट अंमलदार म्हणून महिला पोलीस शिपाई वैशाली संभाजी पुंडगे यांनी सहकार्य केले.

 या लाच लुचपत प्रकरणात लाच खोर तलाठ्याचे वकील अत्यंत नामंकित दुसऱ्या पिढीतील वकील ऍड मनीष रामेश्वर शर्मा (खांडील) यांनी प्रयत्न केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!