अक्कलकोट (प्रतिनिधी) – राष्ट्रीय समाज पक्षाचा येत्या २९ ऑगस्ट २०२६ रोजी २३ वा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, गंजपेठ पुणे येथे आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने आज राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते उपस्थित होते.
यावेळी त्यांच्या समवेत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल शेंडगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य परमेश्वर पुजारी उपस्थित होते. प्रथमतः अक्कलकोट शहर व तालुका कार्यकारिणीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते यांचा सत्कार अक्कलकोट तालुका संघटक गुणवंत लवटे यांच्या हस्ते करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल शेंडगे यांचा सत्कार अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष विलास पाटील,तर प्रदेश कार्यकारिणी सदस्य परमेश्वर पुजारी यांचा सत्कार अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर , अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे, अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष विलास पाटील,अक्कलकोट तालुका वाहतूक विभाग आघाडीचे तालुका उपाध्यक्ष बिरप्पा मैंदर्गी, देवराव बंदिछोडे,संतोष बनसोडे, तुळशीराम माडकर, अवधुत फुलारे, श्रीशैल दिवटे, यासीन शेख, सलीम आवटी यांच्या सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते म्हणाले की येत्या शनिवारी २९ अॉगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा २३ वा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे तरी अक्कलकोट तालुक्यातील महादेवजी जानकर साहेब यांच्या वर प्रेम करणारे सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले. आणि येणारा काळ हा राष्ट्रीय समाज पक्षाचा असणार आहे. कारण सध्या देशात भाजपाच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. जनतेच्या प्रश्नावर आपण आवाज उठवला पाहिजे आणि त्यांना न्याय देण्यासाठी प्रसंगी मोर्चा, आंदोलन, उपोषणाला बसले पाहिजे तरच भाजपाला सत्तेतून पायउतार व्हायला वेळ लागणार नाही. महादेवजी जानकर साहेब हे त्यागी नेतृत्व आहे. गेल्या चाळीस वर्षापासून ते अविरतपणे बहुजन समाजातील उपेक्षित घटकांना अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी आपल्या देहाचा अग्निकुंड केला आहे. सर्व सामान्य गरीब कुटुंबातील मुले पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, मंञी,व्हावे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आहे. तरी आपण तन, मन, धन देऊन महादेवजी जानकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी पुणे येथील वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन शेवते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केले.
