नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज (रेती) उत्खनन व बेकायदेशीर वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बेकायदेशीर रेती वाहतूक करणारे ५ मोठे हायवा ट्रक जप्त करण्यात आले असून, एकूण १ कोटी ५१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईचा सविस्तर तपशील: नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे (पहिली कारवाई): ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री काळेश्वर मंदिर टी-पॉईंट (विष्णुपुरी) येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली. यात ५ ब्रास अवैध रेती व हायवा ट्रक जप्त करून २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात चालक सूर्यभान बाबूराव धुमाळ (वय २६ वर्षे, रा. धुमाळवाडी, जि. नांदेड) आणि वाहन मालक निलेश उकंडराव तेली (वय २३ वर्षे, रा. वासरणी, जि. नांदेड) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे (दुसरी कारवाई): १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी वासरणी ते नावघाट पुलादरम्यान गस्त घालत असताना संशयित वाहनाचा पाठलाग करून बॉडीमास फिटनेस जिम समोर हायवा टिप्पर अडवण्यात आला. या वाहनातून ५ ब्रास रेतीसह ४५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत बेकायदेशीर वाहतूक करणारा चालक आरोपी श्रीकांत नागोराव दर्शने (वय २४ वर्षे, रा. कोडंगाव, ता. लोहा) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण ७५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बारड पोलीस ठाणे कारवाई: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री रेल्वे पाथरड मार्ग ते देगाव रस्त्यावर बारड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे व त्यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. यात ५ ब्रास अवैध रेती आणि हायवा ट्रक असा एकूण ३० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात चालक आरोपी नागोराव नारायण पोत्रे (वय २३ वर्षे, रा. पिंपळगाव, ता. हदगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंधार पोलीस ठाणे कारवाई: ९ ऑक्टोबर २०२६ रोजी बाळांतवाडी (ता. कंधार) येथील रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा भारत बेंझ हायवा ट्रक पकडण्यात आला. या वाहनातून २.५ ब्रास रेतीसह ३० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी चालक व मालक रोहिदास किशन सूर्यवंशी (वय ३१ वर्षे, रा. येळी, ता. लोहा) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विमानतळ पोलीस ठाणे कारवाई: ९ ऑक्टोबर २०२६ रोजी गोविंद नगर, नांदेड येथे टाटा कंपनीचा हायवा ट्रक पकडण्यात आला. यातून ४ ब्रास रेतीसह १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपी चालक माधव रमेश दुधमल (वय ३७ वर्षे, रा. ब्राह्मणवाडा, जि. नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे. दोषींवर कठोर कारवाईचा इशारा: ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू ठेवणार असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 86 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तामसा येथे घरफोडी; सोने-चांदीचे दागिने व रोख रकमेसह २ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लंपास