अवैध रेती उपसा आणि तीरट जुगारावर पोलिसांचा धडाका; 47 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत अवैध रेती उपसा आणि जुगाराविरुद्ध तीन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांमध्ये तब्बल 47 लाख 84 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोदावरी नदीपात्रातील दोन कारवायांमध्ये 20 ब्रास रेती, दोन लोखंडी बोटी, 15 तराफे आणि दोन इंजिने जप्त करण्यात आली, तर एमआयडीसी परिसरातील तीरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा

22 ऑगस्ट रोजी पिंपळगाव निमजी परिसरातील गोदावरी नदीपात्रात लोखंडी बोटी व तराफ्यांच्या साहाय्याने अवैधरीत्या रेती उपसा सुरू असल्याची माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच दोन इसम नदीपात्रातून पलीकडील किनाऱ्याच्या दिशेने पसार झाले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.घटनास्थळावर सुमारे 10 ब्रास रेती, दोन मोठ्या लोखंडी बोटी, 12 तराफे आणि दोन जुनी इंजिने आढळून आली. या मुद्देमालाची अंदाजे किंमत 42 लाख 50 हजार रुपये असून पंचनामा करून तो जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भनगी शिवारातही रेती उपशावर कारवाई

भनगी गावाच्या शिवारातील गोदावरी नदीपात्रातही अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच दोन इसम अंधाराचा फायदा घेत पसार झाले. घटनास्थळी सुमारे 10 ब्रास रेती आणि तीन तराफे आढळून आले. या मुद्देमालाची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. तराफे कापून, जाळून व पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसीत तीरट जुगार अड्ड्यावर छापा

दरम्यान, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेत तीरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 4.10 वाजता पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी राहुल शंकर हैबत, अमोल सुखदेव भोकरे, लखनसिंग बाबासिंग जुनी, परमेश्वर दत्ता हैबतकर आणि भैय्यासाहेब गौतम दुंडे या पाच जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 हजार 300 रुपये रोख, पाच मोबाईल फोन आणि तीन मोटारसायकली असा एकूण 3 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाचही जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार

या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण 20 ब्रास रेती, दोन लोखंडी बोटी, 15 तराफे, दोन इंजिने तसेच जुगार प्रकरणातील रोख रक्कम, पाच मोबाईल आणि तीन मोटारसायकली असा 47 लाख 84 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली. नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान करणारे अवैध रेती उत्खनन, रेती चोरी व वाहतूक तसेच जुगार, मटका आणि अन्य अवैध धंद्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!