नांदेड (प्रतिनिधी)- हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर, व्यापारी प्रतिष्ठानांवर सन्मानाने तिरंगा फडकवून राष्ट्रभक्तीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी केले. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी मंगळवारी सकाळी शहरात हर घर तिरंगा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील तिरंगा ध्वज परिसर, शासकीय तंत्रनिकेतन चौक येथून सकाळी 8 वाजता महापौर कविता मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये मनपा शाळांसह शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाने शहरात राष्ट्रीय सणाचे वातावरण निर्माण झाले. रॅली ज्या मार्गावरून गेली त्या ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून सहभाग नोंदविला. यावेळी महापौर कविता मुळे म्हणाल्या की, तिरंगा ही आपल्या राष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण ठेवत प्रत्येक नांदेडकराने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या अभियानात सहभागी व्हावे. त्यांनी विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या उत्साहाचेही कौतुक केले.या प्रसंगी स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, सभागृह नेते ड. महेश कनकदंडे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, गिरीश कदम, उपायुक्त स. अजितपालसिंघ संधु, गंगाधर ईरलोड, शिक्षणाधिकारी प्रविणा मांदळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी मनपा शिक्षण विभाग, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वाहतूक पोलीस प्रशासन आणि स्वच्छता दूतांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाने त्यांचे आभार मानले. Kanthak Suryatal Post Views: 522 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा लातूरमधील तक्रारदारांशी ‘संवाद’ ११,२८२ कोटींचे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्याच पावसात जलमय; प्रवाशांचे हाल आणि भ्रष्टाचाराचे आरोप