नांदेड जिल्ह्यात घरफोडीच्या दोन घटना; तीन लाखांसह पोषण आहार साहित्याची चोरी, अवैध रेती वाहतुकीवरही कारवाई

नांदेड, प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यात घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये सुमारे ३.३० लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मुदखेड येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

कंधार तालुक्यातील हरवळ येथे ६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाट व पेटीतील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी दशरथ शिवाजी धुगे (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ) व ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि गारोळे करीत आहेत.

दुसरी घटना अर्धापूर तालुक्यातील खरब जिल्हा परिषद शाळेत घडली. ४ ते ५ ऑगस्टदरम्यान अज्ञात चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून पोषण आहारासाठी ठेवलेले धान्य व इतर साहित्य असा ३० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शिक्षक रंगराव कुंडलिक पिंपळे यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोना घोरपडे करीत आहेत.

दरम्यान, मुदखेड येथील आमदुरा चौकात पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करत एमएच-२६-एडी-११०९ क्रमांकाचा टिप्पर ताब्यात घेतला. वाहनामध्ये सुमारे १२ हजार ५०० रुपयांची ब्रास रेती विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. वाहनासह सुमारे १५.१२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अशोक मारोती गालफाडे व वाहनमालकाविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र महसूल अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!