नांदेड (प्रतिनिधी) – २१ जून रोजी घडलेल्या शेख जमीन शेख इसाक हत्या प्रकरणाच्या तपासाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मिर्झा शब्बर बेग मिर्झा गफ्फार बेग याच्यावर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मकोका जोडण्यात आला आहे.
विशेष मकोका न्यायाधीश टी.एस. सोलनकर यांनी आज मिर्झा शब्बर बेगला ६ दिवसांची, म्हणजेच १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वजीराबाद नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मुख्य मारेकरी मिर्झा शब्बर बेग याची पोलीस कोठडी आज संपत असतानाच, पोलिसांनी या गुन्ह्यात मकोका कलमांचा समावेश केला आणि त्याला विशेष न्यायालयात हजर केले.
इतर १२ आरोपींच्या अडचणीत वाढ या खून प्रकरणात आतापर्यंत मिर्झा शब्बर बेगव्यतिरिक्त इतर १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात मकोका लावल्यामुळे, या सर्व १२ आरोपींना पुन्हा एकदा मकोका न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यांची नव्याने पोलीस कोठडी घेतली जाणार असल्याचे समजते.
न्यायालयीन युक्तिवाद सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. यादव तळेगावकर यांनी मिर्झा शब्बर बेगला पोलीस कोठडी देणे का आवश्यक आहे, याबाबतचे महत्त्वपूर्ण मुद्दे न्यायालयासमोर मांडले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

