नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील तामसा व भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन स्वतंत्र फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून, एका प्रकरणात पोलिस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात गुंतवणूक व उपचाराच्या नावाखाली तब्बल १३ लाख ५४ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलीस असल्याचे सांगून ठकले
पहिल्या घटनेत, १६ जुलै २०२६ रोजी दुपारी तामसा परिसरातील वडगाव (बु.) रोडवर एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला पोलीस असल्याचे सांगून एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला विश्वासात घेतले. मोबाईल व सोन्याची अंगठी रुमालात बांधून ठेवण्यास सांगून आरोपीने सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी हातोहात लंपास केली. याप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१९(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दुसऱ्या घटनेत, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपक नगर, तरोडा (बु.) येथील एका महिलेने ओळखीच्या युवतीवर विश्वास ठेवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक तसेच पतीच्या उपचारासाठी वेळोवेळी १३ लाख ५४ हजार ५०० रुपये ऑनलाइन दिले. मात्र आरोपीने रक्कम परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३१६(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही आमिषाला किंवा खोट्या ओळखीला बळी न पडता आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
