घरफोडी व चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता; लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विमानतळ, सिंदखेड आणि भोकर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे ३.५८ लाख रुपयांचा ऐवज व रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदनगर येथे १६ जुलैच्या रात्री ते १७ जुलैच्या सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील १० हजार रुपयांची रोकड आणि सॅमसंग कंपनीचा सुमारे १८ हजार रुपयांचा टीव्ही असा एकूण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अफरोज खान इनायतखान पठाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत, सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारखणी येथील धनश्री ज्वेलर्स या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार दुकान मालक अशोक सिताराम रुणवाल यांनी दिली. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

तर, भोकर शहरातील शंकर नगरी बँकेसमोर उभी असलेल्या स्कुटीच्या डिकीत ठेवलेली १ लाख ६० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी वायुजित सुरेशराव कदम यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.तीन्ही घटनांमुळे जिल्ह्यात चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी घर, दुकाने आणि वाहनांमध्ये मोठी रोकड किंवा मौल्यवान वस्तू निष्काळजीपणे न ठेवता आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!