नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड येथील रहिवासी सुजित भीमराव सुरवसे हे आपल्या काही कामानिमित्त नांदेडमध्ये आले होते. त्यांच्या एका मित्राने मालेगाव रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मधून ४ लाख रुपये काढले आणि ते सुरवसे यांच्याकडे सोपवले. ही मोठी रक्कम सुरवसे यांनी आपल्या (MH 19 CV 9001) क्रमांकाच्या कारमध्ये एका बॅगेत सुरक्षित ठेवली होती.
यानंतर, बँकेच्या समोरच असलेल्या बियाणी कॉम्प्लेक्समध्ये एका वकिलांची भेट घेण्यासाठी सुरवसे गेले. त्यावेळी कारमध्ये त्यांच्या दोन मुली बसलेल्या होत्या. हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी आपला डाव आखला.
चोरट्यांची चलाखी आणि मुलींची फसवणूक चोरटे कारच्या जवळ आले आणि त्यांनी कारमध्ये बसलेल्या मुलींना उद्देशून सांगितले की, तुमच्या कारच्या इंजिनखाली ऑइल सांडले असून गाडीला आग लागू शकते, तुम्ही तातडीने खाली उतरा. लहान मुलींनी या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि घाबरून त्या घाईघाईने कारच्या बाहेर उतरल्या. मुली कारमधून खाली उतरताच, एका चोरट्याने कारचा दुसरा दरवाजा उघडला आणि आत असलेली ४ लाख रुपयांची बॅग अत्यंत वेगाने उचलली. काही कळण्याच्या आतच हे तिन्ही आरोपी आपल्या दुचाकीवरून पसार झाले.
पोलिसांकडून सीसीटीव्हीचा आधार घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील दुकानांचे आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्या ताब्यात घेतले असून, त्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नांदेडचे नवीन पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी पदभार स्वीकारताच ही मोठी घटना घडल्याने, साहेब आले अन् चोरट्यांना लाभ झाला अशी खोचक चर्चा शहरात सुरू झाली आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना भरदिवसा आणि गजबजलेल्या रस्त्यावर अशा प्रकारे चोरी झाल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कारमध्ये मोठी रक्कम असताना अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. गाडीतून ऑइल गळत आहे, पैसे पडले आहेत किंवा धूर येत आहे अशा बतावणी करून चोरटे लक्ष विचलित करतात. त्यामुळे अशा प्रसंगी सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. भाग्यनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच आरोपी जेरबंद होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
