तुकाराम मुंडे : भेसळ, गुटखा आणि भ्रष्ट साखळीविरोधातील लढ्याला नांदेडकरांचा सलाम

नांदेड (प्रतिनिधी)-वर्षानुवर्षे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यवसायांच्या साखळीवर अखेर कायद्याचा कठोर आसूड ओढला जात असल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे भेसळखोर माफियांचे धाबे दणाणले असून, या मोहिमेचे नेतृत्व करणारे तुकाराम मुंडे हे नाव आज जनतेच्या आशेचे आणि विश्वासाचे प्रतीक ठरत आहे.

दूध, पनीर, मिठाई, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र आता या भेसळीच्या साम्राज्यावर थेट घाव घालण्याचे धाडस प्रशासनाने दाखविल्याने सामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. भेसळीचे अड्डे सील होत आहेत, माल जप्त होत आहे आणि दोषींवर कारवाई होत असल्याने कायद्याची भीती पुन्हा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने या कारवाईमुळे काही हितसंबंधी किती अस्वस्थ झाले आहेत, याची प्रचिती राज्याला आली. तरीही कारवायांचा वेग कायम असल्याने नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत होत आहे.

दरम्यान, काल नांदेड शहरातील तोष्णीवाल मेडिकल्सवर झालेल्या कारवाईनंतर आज शहरातील अनेक पानटपऱ्या, दूध डेऱ्या आणि काही बेकरी बंद दिसून आल्याची चर्चा दिवसभर रंगली. कारवाईची धास्ती आणि तपासाची भीती यामुळे अनेकांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

याचवेळी काही दिवसांपूर्वी अर्धापूर पोलिसांनी गुटखा प्रकरणात केलेल्या कारवाईचीही चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहे. संबंधित गुटखा विक्रेत्याने हा माल नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातून आणल्याची माहिती दिल्याची चर्चा असून, त्यानंतर अर्धापूर पोलिसांनी देगलूर नाका परिसरात येऊन चौकशी आणि कारवाई केल्याचे बोलले जात आहे. त्या कारवाईदरम्यान अनेक घडामोडी घडल्याच्या चर्चा आजही शहरात सुरू आहेत. मात्र या सर्व बाबींना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त होत आहे की, भेसळखोरीविरोधात ज्या कठोरतेने तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू आहे, त्याच निष्पक्षतेने गुटखा, अवैध व्यापार आणि चर्चेत असलेल्या इतर प्रकरणांचीही चौकशी व्हावी. सत्य काहीही असो, ते जनतेसमोर यावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ग्राहकांना शुद्ध अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, तर प्रामाणिक शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे हा त्याचा अधिकार आहे. या दोन महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी सुरू असलेल्या लढ्याला समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

आज नांदेडमध्ये एकच चर्चा ऐकायला मिळते. “भेसळ, गुटखा आणि आरोग्याशी खेळणाऱ्या प्रत्येक गैरप्रकाराविरोधात कारवाई झाली पाहिजे.” तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, या कारवायांचा विस्तार करून संपूर्ण साखळी उघडकीस आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित व्हिडिओ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!