नांदेड – सर्वज्ञ चक्रधर स्वामीनी इ.सनाच्या अकराव्या शतकात मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान मांडून ते समाजात रूजविण्याचा अविरत प्रयत्न केला. सामाजिक समतेची चळवळ ही महानुभाव पंथापासून सुरू झाली. संविधानाची मूल्ये ही मानवतेची मूल्ये आहेत. ती आपण महानुभाव साहित्यातून घेतली आहेत. आज ती आपण जपली पाहिजेत असे मत प्राचार्य डॉ.मा. मा. जाधव यांनी व्यक्त केले. ते डॉ. संजय जगताप लिखित सर्वज्ञ संचित ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
महानुभव साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. संजय जगताप यांच्या सर्वज्ञ संचित या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालयात थाटात संपन्न झाला. हा ग्रंथ सायास पब्लिकेशन नांदेड यांनी प्रकाशित केला आहे.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव होते तर मेरठ उत्तर प्रदेश येथील डी. लीट पदवी प्राप्त विचारवंत, महानुभाव साहित्याचे व्यासंगी अभ्यासक परमपूज्य डॉ. बाबासाहेब बीडकर यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सर्वज्ञ संचित प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक संयोजन समितीचे सदस्य प्रा. डॉ. माधव जाधव यांनी केले. याप्रसंगी लेखक डॉ. संजय जगताप यांनी या ग्रंथाच्या निर्मितीविषयीची भूमिका सविस्तर विशद केली. यानंतर आय. आर. एस. प्रशासकीय अधिकारी अंकेत जाधव, मराठी भाषा विद्यापीठ रिद्धीपुर जि. अमरावती येथील अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे, अमरावती येथील महानुभव साहित्याचे अभ्यासक प्रा. संदीप तडस व नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्या चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ.भारतभूषण शास्त्री यांनी या ग्रंथावर समयोचित भाष्य केले. समकाळातील या ग्रंथाचे महत्त्व, या ग्रंथातील सामर्थ्य स्थळे, लेखकाचा दृष्टिकोन आणि वाचकांनी हा ग्रंथ का वाचावा याबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी या अभ्यासाकांनी केली.
सर्वज्ञ संचित या चिंतनशील ग्रंथाची निर्मिती केल्याबद्दल प्रा. डॉ. संजय जगताप यांचे डॉ. बाबासाहेब बिडकर यांनी कौतुक केले व हा ग्रंथ महत्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मा.मा. जाधव म्हणाले की, अशा ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी लेखकाचा त्या विषयाचा अभ्यास, त्याची एक विशिष्ट भूमिका असावी लागते आणि त्यांच्याकडे धाडस असावे लागते. प्रसंगी असे विचार रुजवण्यासाठी त्याची किंमतही मोजावी लागते ते धाडस संजय जगताप यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. छाया जगताप यांनी केले. हा समारंभाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे सदस्य प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण प्रा. डॉ. हंसराज जाधव प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव प्रा. डॉ.व्यंकटी पावडे प्रा. रामदास बोखारे तसेच सायास प्रकाशनाचे प्रकाशक डॉ. सौरभ जाधव, अत्रेय जगताप आणि जगताप कुटुंबीय व मित्रांनी परिश्रम घेतले.
सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान आजही समाजहिताचेच – प्राचार्य डॉ. मा.मा. जाधव
