नांदेड – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षा व मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बल (RPF), नांदेड विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अमानत व ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत १४ जून २०२६ रोजी उल्लेखनीय यश संपादन करण्यात आले. ऑपरेशन अमानत अंतर्गत, दिनांक ११ जून २०२६ रोजी रेलमददद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार एका महिला प्रवाशाने गाडी क्रमांक ०७०५४ काचिगुडा स्पेशल एक्सप्रेसच्या ए-१ कोचमधील बर्थ क्रमांक २२ वर आपली पर्स विसरून हजूर साहिब नांदेड स्थानकावर उतरल्याची माहिती मिळाली. तक्रार प्राप्त होताच RPF मुदखेडच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करून संबंधित डब्यातून पर्स शोधून सुरक्षित ताब्यात घेतली. त्यानंतर दिनांक १४ जून २०२६ रोजी संबंधित प्रवासी कु. अंकिता गुप्ता यांनी RPF मुदखेड चौकी येथे उपस्थित राहून आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर त्यांना पर्स सुपूर्द करण्यात आली. सदर पर्समध्ये टायटन कंपनीचे मनगटी घड्याळ, रिअलमी इअरफोन्स, ₹१,७१० रोख रक्कम, दोन डेबिट कार्ड, चाव्या व मोबाईल चार्जर असा सुमारे ₹९,००० किमतीचा ऐवज होता. हरवलेला माल सुखरूप परत मिळाल्याबद्दल प्रवाशांनी RPF चे आभार व्यक्त केले. याच दिवशी ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आणखी एका महत्त्वपूर्ण कारवाईत RPF च्या गुन्हे गुप्तवार्ता शाखेने (CIB), नांदेड यांनी परभणी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सामान चोरीविरोधात विशेष देखरेख करत असताना एका संशयित चोरट्यास ताब्यात घेतले. सदर व्यक्ती प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभ्या असलेल्या गाडी क्रमांक १७६६२ नागरसोल–काचेगुडा एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करताना आढळून आली. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितास पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी GRP परभणी यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ११० व ११७ अन्वये गुन्हा क्रमांक १२८/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील तपास GRP मार्फत सुरू आहे. या यशस्वी कारवायांमधून RPF नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षा सुनिश्चित करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध करणे आणि रेल्वे प्रवाशांना वेळेवर मदत उपलब्ध करून देणे याबाबतची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 348 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये बिग बेअर हबचा फी वसुलीचा धडाका; नर्सरीसाठी ४५ हजारांची मागणी, पालकांचे कंबरडे मोडले! सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान आजही समाजहिताचेच – प्राचार्य डॉ. मा.मा. जाधव