कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजितचे आई- वडील अज्ञातवासात;भीती कि धोखा 

कॉकरोच जनता पार्टीचा सुळसुळाट आणि लोकशाहीचा हिट स्प्रे: एक उपरोधिक विश्लेषण

ध्या आपल्या देशात अमृतकाळ सुरू आहे, हे तर तुम्हाला ठाऊकच असेल. या काळात नोकरी मिळत नाही, पेपर फुटतात आणि महागाई वाढते, हे सगळे गौण विषय आहेत. मुख्य विषय हा आहे की, लोकशाहीच्या या भव्य प्रासादात आता झुरळांनी शिरकाव केला आहे. होय, तुम्ही बरोबर ओळखलंत मी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) बद्दल लिहीत आहे. ज्या पक्षाला कालपर्यंत केवळ सोशल मीडियावरील एक मीम समजून वाटेला लावले जात होते, त्याच पक्षाने आता थेट दिल्लीच्या जंतरमंतरवर शड्डू ठोकल्यामुळे दिल्लीच्या तख्ताला घाम फुटला आहे.

प्रेसनोट आणि यशस्वी नेतृत्वाचा मौन व्रत

गेल्या १२ वर्षांत आपल्या यशस्वी प्रधानमंत्र्यांना जे जमलं नाही, ते या झुरळांच्या पक्षाने एका संध्याकाळात करून दाखवलं. त्यांनी चक्क प्रेस कॉन्फरन्स घेतली!. ज्या देशात पत्रकारांना फक्त आंबा कसा खाता? असे प्रश्न विचारण्याची मुभा असते, तिथे या पक्षाने थेट शिक्षण व्यवस्था आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विचार करा, ज्या झुरळांना आपण स्वयंपाकघरात बघितलं की चप्पल उगारतो, ती झुरळं आता चक्क शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करत आहेत. हे म्हणजे लोकशाहीचे किती मोठे अध:पतन आहे, नाही का?

बोस्टन ते छत्रपती संभाजीनगर: एक भय कथा

या पक्षाचे संस्थापक आहेत अभिजीत दिपके. हे गृहस्थ ३० वर्षांचे आहेत आणि अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहतात. आता विचार करा, अमेरिकेत बसून कोणाला भारतातील शिक्षण व्यवस्थेची काळजी कशी काय वाटू शकते? तिथे तर पेपर फुटत नाहीत, मग यांना इथल्या ३० लाख विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची काळजी का वाटावी?. ६ जूनला हे महाशय भारतात येणार आहेत आणि त्यांनी त्यांच्या समर्थकांना थेट विमानतळावर भेटायला बोलावले आहे.

पण खरी गंमत पुढेच आहे. अभिजीत दिपके भारतात येण्यापूर्वीच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांनी घर सोडलं आहे. भगवानराव दिपके! एमएसईडीसीमधून इंजिनिअर म्हणून सन्मानाने निवृत्त झाले आणि आता मुलगा झुरळ पक्षाचा संस्थापक असल्यामुळे त्यांना अज्ञात स्थळी राहावे लागत आहे. घर रिकामं आहे, पण बाहेर पोलिसांचा कडा पहारा आहे. आता हे पोलीस घराचे रक्षण करत आहेत की रिकाम्या भिंतींचे, हे कोडे सुटण्यासारखे नाही. भगवानराव म्हणतात की, त्यांना कोणतीही धमकी मिळालेली नाही, पण पालकाची भीती तर असणारच. आपल्या देशात डिसेंट किंवा विरोध हा इतका पवित्र शब्द झाला आहे की, तो व्यक्त करायचा विचार जरी केला, तरी कुटुंबियांना अज्ञातवासात जावे लागते. हेच तर आपल्या सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे!

डीप स्टेट आणि झुरळांचे जागतिक षडयंत्र

जेव्हा एखादी गोष्ट सरकारला झेपत नाही, तेव्हा एक रामबाण उपाय असतो विदेशी हात किंवा राष्ट्रविरोधी शक्ती. कॉकरोच जनता पार्टीच्या विरोधात अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याचा दावा असा होता की, हे झुरळ विदेशी आणि डीप स्टेट कडून फंडेड आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही झुरळं जनरेशन झेडला भडकवत आहेत आणि देशाची अखंडता धोक्यात आणत आहेत.

विचार करा, एका झुरळामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येते, हे ऐकून त्या झुरळालाही स्वतःचा अभिमान वाटला असेल. याचिकाकर्त्याने तर या पक्षाची चौकशी एनआयए (NIA) आणि ईडी (ED) मार्फत करण्याची मागणी केली होती. पण हायकोर्टाचे न्यायमूर्ती शेखर बी. सराफ आणि अवधेश कुमार चौधरी यांनी याचिकाकर्त्यालाच चांगलेच झापले. बाबा रे, तू राहतोस बेंगळुरूमध्ये, मग लखनऊ कोर्टात कशाला आलास? आधी कर्नाटक हायकोर्टात जा, असे कोर्टाने सुनावले. म्हणजे बेंगळुरूच्या माणसाला लखनऊमध्ये येऊन झुरळांची भीती वाटते, यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता !

शांतीपूर्ण आंदोलनाचा धोका

CJP चे प्रवक्ते आशुतोष राणा ओरडून सांगत आहेत की, आमचे आंदोलन शांततापूर्ण असेल, आम्ही कायद्याचा आदर करू. पण आपल्या व्यवस्थेला शांततेची अधिक भीती वाटते. कारण गोंधळ झाला तर लाठीचार्ज करता येतो, पण लोक शांत बसले तर सरकारचे काय होणार?. अभिजीत दिपके यांनी तर चक्क सोनम वांगचुक, प्रकाश राज आणि निखिल वागळे यांसारख्या विद्वान आणि सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले आहे. आता ज्या आंदोलनात इतकी मोठी नावे असतील, तिथे केवळ शिक्षणावर चर्चा होणार नाही, तर व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार.

झुरळांचे वैशिष्ट्य असे असते की, ती कितीही संकटात असली तरी तग धरून राहतात. अभिजीत दिपके म्हणतात की, ते अटकेसाठी तयार आहेत. ही लढाई केवळ नीट (NEET) परीक्षेच्या ३० लाख विद्यार्थ्यांची नाही, तर एकूण ७०-८० लाख लोकांच्या भविष्याची आहे. राजस्थानची एसआय भरती असो किंवा यूपी पोलीस कॉन्स्टेबलचा पेपर लीक, या सर्व विषयांवर हे झुरळ बोलणार आहेत.

निष्कर्ष: लोकशाहीचे नवीन पेस्ट कंट्रोल

तर मंडळी, ६ जूनला जंतरमंतरवर काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका बाजूला सरकारची धडधड वाढली आहे, तर दुसरीकडे न्यायालयीन लढाईत झुरळांचा सध्या तरी विजय झाला आहे. आपल्या देशात जेव्हा शिक्षण व्यवस्था सडते, तेव्हा तिथे झुरळं तयार होणं स्वाभाविक आहे. आता ही झुरळं व्यवस्थेतील घाण साफ करतात की स्वतः त्या घाणीचा भाग होतात, हे काळच ठरवेल.

पण एक गोष्ट नक्की, जोपर्यंत देशात पेपर फुटत राहतील आणि शिक्षण मंत्री केवळ आश्वासने देत राहतील, तोपर्यंत ही कॉकरोच जनता पार्टी वाढतच राहणार. कारण झुरळं एकदा घरात शिरली की ती घालवणं सोपं नसतं, मग तुम्ही कितीही आयकॉनिक स्प्रे मारला तरी!.

आता आपण फक्त वाट पाहूया ६ जूनची. जंतरमंतरवर झुरळांचे राज्य येणार की पुन्हा एकदा व्यवस्थेचा झाडू त्यांना कोपऱ्यात ढकलणार? हे पाहणे खरोखरच मनोरंजक ठरेल.कारण मुंबई विमानतळावर लद्दाखच्या नेते सोनम वांगचुग सुद्धा अभजीत दिपके सोबत येणार आहेत, सोनम वांगचुग यांनी सांगितले की मी एकदा तुरुंगात जाऊन आलो आहे.सरकार या पेक्षा जास्त काही करू शकत नाही हे मला कळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!