नांदेड (प्रतिनिधी)- पेट्रोलपंपांवर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा सायबर पोलीसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एक चारचाकी वाहन, पाच मोबाईल फोन तसेच रोख रकमेसह एकूण ९ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सायबर पोलीस ठाणे, नांदेड येथे दाखल गुन्हा क्रमांक 195/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(ड) अन्वये ही कारवाई करण्यात आली. 21 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1.23 वाजता मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि त्याच दिवशी गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळवले.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पथकाने तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन, डिजिटल व्यवहारांची छाननी आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी पेट्रोलपंपांवर येणाऱ्या ग्राहकांना स्कॅनर व ऑनलाइन पेमेंटच्या नावाखाली बनावट QR कोड वापरून पैसे स्वतःच्या खात्यात वळवण्याची युक्ती वापरत असल्याचे तपासात समोर आले आहे.हे सायबर पोलीस निरीक्षक वसंत सप्रे,पोलीस अंमलदार दीपक ओढणे,विलास राठोड,अविनाश ढोके,दावीद पिडगे,काशिनाथ कारखेडे,ज्ञानेश्वर यन्नावार यांनी पूर्ण केले.
ग्राहकांना पेमेंट झाले असल्याचा भास निर्माण करून आरोपी घटनास्थळावरून पसार होत असत. अनेक नागरिक या प्रकाराला बळी पडल्याची शक्यता असून पोलीस पुढील तपासाद्वारे आणखी गुन्ह्यांचा तपास करत आहेत.
या कारवाईत सायबर पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील डिजिटल माहितीची तपासणी सुरू असून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही या टोळीचे जाळे असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणी पोलिसानी तक्रारदार शेख मसूद शेख अब्दुल रशीद यांच्या तक्रारी नुसार अल्ताफ सरवर आतार वय २३ रा. घुळा कामारेड्डी,योगेश उत्तम पांचाळ वय २६ रा. कामारेड्डी,तौफिक अशरफ शेख वय २३ रा जालना हल्ली मुक्काम पुणे यांना अटक केली आहे.
दरम्यान, नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना QR कोड स्कॅन करण्यापूर्वी खात्री करावी, अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून व्यवहार करू नयेत तसेच संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित सायबर पोलीसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सायबर गुन्ह्यांविरोधातील ही कारवाई नांदेड पोलिसांसाठी मोठे यश मानले जात असून डिजिटल फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
