विजय जोशी यांचा झुंजार पत्रकार पुरस्कार देऊन गौरव

नांदेड (प्रतिनिधी) – शब्दांची शस्त्रे हातात घेऊन समाजहितासाठी अविरत लढणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान होताना अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. सामना वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी, राज्य शासनाच्या अधिस्वीकृती मंडळाचे लातूर विभागाचे अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष विजय जोशी यांना परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात झुंजार पत्रकार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

हा प्रेरणादायी सोहळा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.  पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना विजय जोशी यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, ब्राह्मण समाजाच्या वतीने मिळालेला हा सन्मान माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार केवळ गौरव नसून माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे. त्यामुळे माझी सामाजिक जबाबदारी आणि दायित्व अधिक वाढले आहे. समाजातील बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजा सोबत खांद्याला खांदा लावून कार्य करीन. या प्रसंगी शहरातील विविध वर्तमानपत्राचे पत्रकार किरण कुलकर्णी, बजरंग शुक्ला, प्रल्हाद कांबळे, संतोष कुलकर्णी, प्रशांत गवळे, कृष्णा उमरीकर आणि रमेश देवडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुलकर्णी यांनी केले. सन्मान, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेच्या मूल्यांचा संगम घडविणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!