नांदेड (प्रतिनिधी) – दारू पिण्याच्या सवयीला पत्नीने विरोध केल्याच्या कारणावरून तिचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पतीला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या प्रकरणातील फिर्यादी मारोती काशीराम गोरे (रा. दोंडगाव, ता. कळमनुरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी वेदिका हिचे लग्न केदारनाथ तुकाराम भुलगे याच्याशी झाले होते. केदारनाथ हा दारू पिण्याच्या व्यसनाधीन असल्याने वेदिका नेहमी त्याला विरोध करत असे. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दि. २२ जून २०२२ रोजी रात्री सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास केदारनाथने फोन करून तुमच्या मुलीला काहीतरी झाले आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी कुटुंबासह तातडीने मुलीच्या घरी पोहोचले असता वेदिका ही घरात गंभीर अवस्थेत पडलेली दिसून आली. तिच्या गळ्यावर व कपाळावर जखमा असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे आढळले. तिला तात्काळ मृत घोषित करण्यात आले. या घटनेप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक आर. टी. नांदेडकर यांनी तपास करून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे न्यायालयात सादर केले. साक्षीदारांचे जबाब व वैद्यकीय अहवालांच्या आधारे न्यायालयाने आरोपी केदारनाथ भुलगे याला दोषी ठरवले. या प्रकरणाची सुनावणी मा. सत्र न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अन्वये १० वर्षांची सक्तमजुरी व १०,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अड.मोहम्मद अब्बास आणि व अड यादव तळेगावकर यांनी जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. रणजित देशमुख यांच्या मार्गदर्शनात काम केले. पोलीस अंमलदार आर. बी. गुंतूळवाड यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पाहिले. Kanthak Suryatal Post Views: 561 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इराणच्या 10 हजार कमांडोना झोला देऊन 90 लाख ब्यारल तेल निर्यात केले विजय जोशी यांचा झुंजार पत्रकार पुरस्कार देऊन गौरव