नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत साचलेल्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपुरा भागातील ही मुले शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. दरम्यान, हारूनबाग परिसरात एका मोठ्या खड्ड्यात पाणी साचलेले होते. उष्णतेमुळे पोहण्यासाठी मुले पाण्यात उतरली; मात्र पाणी खोल असल्याचा अंदाज त्यांना आला नाही. परिणामी, चारही मुले पाण्यात बुडाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी मुलांच्या चप्पला, बूट व शालेय गणवेश आढळून आले.
मृत मुलांची नावे महोमद अली मोहमद ईद्रीस (वय 13), सय्यद फूरखान सय्यद फिरोज (वय 13), मोहमद अदनान मोहमद फिरोज (वय 10) आणि मोहमद रेहान (वय 11) अशी आहेत. सर्व मुले आठ ते बारा वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे. यातील मोहम्मद फुरखान आणि मोहम्मद रेहान हे दोन्ही बंधू आहेत.
दरम्यान, या ठिकाणी महापालिकेमार्फत खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमातून नाल्याचे काम सुरू असून, संबंधित खड्डा नेमका कोणी व कसा खणला याबाबत स्पष्टता नाही. घटनेची माहिती मिळताच एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या दुर्घटनेला जबाबदार कोण याची सखोल चौकशी सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
