नांदेड (प्रतिनिधी)- नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात (AIPDM) नांदेड परिक्षेत्रातील परभणी जिल्हा पोलीस दलाच्या टायसन नावाच्या श्वानाने चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले आहे. या यशाने नांदेड परिक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दोन पदकांची लयलूट या स्पर्धेत ‘टायसन’ने दोन वेगवेगळ्या प्रकारात आपली कौशल्ये सिद्ध केली. त्याने आज्ञाधारकता या विषयात सुवर्णपदक पटकावले, तर अज्ञात व्यक्तीने दिलेले अन्न नाकारणे या प्रकारात रौप्यपदक प्राप्त केले. या श्वानाचे हँडलर पोलीस हवालदार रामचंद्र जाधव व पोलीस शिपाई सादेक पठाण यांनी त्याला उत्कृष्ट प्रशिक्षण दिले होते. देशभरातील श्वानांशी झुंज – ही स्पर्धा २९ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ०४ च्या मैदानावर पार पडली. यात भारतातील २८ घटक राज्ये, ८ केंद्रशासित प्रदेश आणि बीएसएफ (BSF), एनएसजी (NSG), आयटीबीपी (ITBP), सीआयएसएफ (CISF) यांसारख्या विविध केंद्रीय सुरक्षा दलांतील एकूण १४८ श्वान सहभागी झाले होते. इतक्या मोठ्या स्तरावरील स्पर्धेत टायसनने महाराष्ट्राचे आणि विशेषतः नांदेड परिक्षेत्राचे नेतृत्व करत हे यश मिळवले. टायसनची आजवरची उत्कृष्ट कारकीर्द- टायसन सन २०२२ मध्ये परभणी पोलीस दलात दाखल झाला. त्याने सीआयडी (CID) पुणे येथे आपले विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याने आजवर अनेक चोरी, दरोडा, खून आणि बेपत्ता व्यक्तींच्या तपासात मोलाची मदत केली आहे. यापूर्वी त्याने २०२३ मध्ये नांदेड परिक्षेत्र मेळाव्यात सुवर्णपदक आणि २०२५ च्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात रौप्यपदक पटकावले होते. बक्षीस आणि कौतुक या यशाबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी श्वान पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे. तसेच, या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांनी पथकाला २५,००० रुपयांचे बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे. या यशासाठी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, श्रीमती अश्विनी जगताप आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन सहायक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड,पोलीस उप निरीक्षक आयुबखान पठाण,श्वान प्रशिक्षक रामचंद्र जाधव,सादेक पठाण यांना लाभले. Kanthak Suryatal Post Views: 672 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation E20 इंधन सक्ती – सर्वसामान्यांच्या खिशावर आणि वाहनांवर मोठा प्रहार घरफोडी प्रकरणाचा उलगडा; आरोपी अटकेत, 3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त