जगभरात युद्धाच्या बातम्या सुरू आहेत. कुठे तेल, कुठे गॅस, कुठे समुद्री मार्ग बंद होण्याची चर्चा आणि या सगळ्याचा परिणाम भारतात काय? तर आपल्या शेतकऱ्याच्या हातात रिकामं खताचं पोतं आणि व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य! नांदेड जिल्ह्याचे युरिया खत दुसऱ्या जिल्ह्यात विकले जात आहे. ती घटना एका ट्रक अपघाताने समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय तणावामुळे तेल-गॅस पुरवठ्यावर संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञ सांगतात की युद्ध लांबल्यास ऊर्जा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पण भारतात प्रशासन आधीच दूरदृष्टी दाखवत आहे कारण इथे संकट येण्याआधीच खताचा तुटवडा “अनुभवायला” मिळत आहे. युरिया खत हा शेतीचा प्राणवायू मानला जातो. मात्र सध्या परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला युरियाचे एक पोते हवे असेल तर त्याला सोबत दोन-तीन इतर खतांची खरेदी अनिवार्य केली जाते. म्हणजे शेतकरी शेती करतो की खत दुकानाचा सेल टार्गेट पूर्ण करतो, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकाची गरज वेगळी आणि व्यापाऱ्याची अट वेगळी शेवटी नुकसान मात्र शेतकऱ्याचं. दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यातील पूर्णा परिसरात एक ट्रक आडवा पडलेला फोटो समोर आला. ट्रक क्रमांक एमएच-26-सीएम-2991. खात्री लायक सूत्रांच्या माहितीनुसार त्या ट्रकमध्ये युरिया खताचा साठा असल्याची चर्चा आहे. आता खरी गंमत इथून सुरू होते. जर ती गाडी नांदेड जिल्ह्याची असेल तर पूर्णा कडे का जात होती? आणि जिल्ह्यासाठी आलेला खतसाठा जिल्ह्यातच वापरायचा असताना तो महामार्गावर पर्यटनाला निघाला होता का? खताला सुद्धा “आउटस्टेशन टूर” मिळते का, असा निरागस प्रश्न शेतकरी विचारताना दिसतो. प्रशासन मात्र शांत आहे. कारण प्रशासनाला सर्व काही माहिती असतं फक्त योग्य वेळ येईपर्यंत ते बोलत नाही, अशी लोकांची श्रद्धा आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्याचे “भगवान विष्णू” अशी उपाधी दिली जाते; म्हणजे पालनपोषण, संरक्षण आणि संतुलन राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मग खत वितरणातील असंतुलन कोण पाहणार? शेतकरी की सोशल मीडिया? कृषी विभागाकडे नियंत्रण यंत्रणा आहे, तपास यंत्रणा आहे, अहवाल आहेत, बैठका आहेत… फक्त शेतकऱ्याला वेळेवर खत मिळणं हा छोटासा तांत्रिक मुद्दा बाकी राहतो. आज परिस्थिती अशी आहे की जगात युद्धामुळे तेल-गॅस संकट येईल की नाही हे भविष्यात कळेल; पण ग्रामीण भागात खत संकट आधीच वास्तव बनलं आहे. शेतकरी रांगेत उभा, व्यापारी अटी घालत आहेत, आणि प्रशासन फाईलच्या पानांमध्ये समाधान शोधत आहे. प्रश्न साधा आहे खत शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे की मध्येच मार्ग बदलत आहे? साठा योग्य ठिकाणी वापरला जातोय की अदृश्य होत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं संकट आल्यावर उपाय करायचा की संकट येण्याआधीच व्यवस्था करायची? कारण शेवटी युद्ध कुठेही झालं तरी परिणाम भारतीय शेतकऱ्याच्या शेतातच दिसतो. आणि जर खत वेळेवर मिळालं नाही, तर पुढचं युद्ध पिकाच्या शेतातच सुरू होणार निसर्गाशी नाही, तर व्यवस्थेशी! Kanthak Suryatal Post Views: 755 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गणपतराव जाधव यांचे दुःखद निधन सिद्धार्थ जोंधळे यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार