नांदेड शहरात दंडाची आकडेवारी भारी, पण रस्ते मात्र पार्किंगच्या दयेवर!
नांदेड (प्रतिनिधी)- शहरात वाहतूक शिस्तीची मोठी मोहीम सुरू असल्याचे चित्र प्रशासनाकडून रंगवले जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून आज इतक्या वाहनांवर दंड ठोकला याची आकडेवारी मिरवली जाते; मात्र प्रत्यक्षात शहरातील काही ठिकाणी नियम नावालाच उरले असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.
शिवाजीनगर–उडाणपूर ते अश्विनी हॉस्पिटल ब्रिज हा मार्ग सध्या अनधिकृत पार्किंगचा अधिकृत अड्डाच बनला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर दवाखाने आणि हॉस्पिटल्स असूनही आणि विशेष म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पार्किंगच्या जागा उपलब्ध असतानाही वाहनांची मिरवणूक मात्र थेट रस्त्यावरच उभी असते.कारण सर्व दवाखान्यांची आपल्या पार्किंगच्या जागेत व्यवसाय थाटला आहे. रस्ता वाहतुकीसाठी आहे की खासगी पार्किंगसाठी, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे.
रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर मंडळी आणि काही वेळा ॲम्बुलन्स चालकही नियमांना साईडला ठेवून वाहनं रस्त्यावर उभी करत असल्याचे चित्र रोजचे झाले आहे. परिणामी, वाहतूक कोंडी इतकी वाढते की आपत्कालीन रुग्णवाहिकेलाही मार्ग काढताना कसरत करावी लागते. मात्र आश्चर्य म्हणजे, या सर्व प्रकाराकडे वाहतूक विभागाचे लक्ष अजूनही न पोहोचलेले’ दिसते.
इतर भागात दंड मोहिमा जोरात सुरू असतात हेल्मेट, सीटबेल्ट, सिग्नल उल्लंघन यावर तत्पर कारवाई होते.त्याचे फोटो काढले जातात आणि प्रेसनोटच्या माध्यमाने प्रसिद्धी साठी पाठवले जातात. पण ब्रिज परिसरात मात्र नियम बहुधा व्हीआयपी सुट्टी वर असावेत, अशी उपरोधिक चर्चा नागरिकांत सुरू आहे. मग प्रश्न असा नियम सर्वांसाठी समान आहेत की ठिकाणानुसार बदलतात?
याच धर्तीवर आयटीआय परिसर, गोदावरी स्वीट बेकरी, फुले मार्केट आणि मॉल परिसरातही अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक त्रस्त आहे. मात्र येथेही कारवाई क्वचितच दिसते. त्यामुळे दिसत नाही की दुर्लक्ष करायचे ठरवले आहे? असा बोचरा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांचे स्पष्ट मत आहे की, दवाखान्यांनी स्वतःच्या पार्किंग व्यवस्थेचा वापर सक्तीने करावा आणि रस्त्यावर वाहन उभी करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई व्हावी. केवळ आकडेवारी दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्ते मोकळे करण्याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारण्याची वेळ आली आहे.
परिस्थिती जशी आहे तशी मांडणे हे माध्यमांचे काम आहे आणि तेच येथे केले आहे. या नंतर यल्लो जर्नलिझम करता असा आरोप झाला तरी तो आम्ही झेलण्यास तयार आहोच. आता प्रशासनानेही कागदावरील कारवाईतून बाहेर येत शिवाजीनगर–उडाणपूर ते अश्विनी हॉस्पिटल ब्रिज परिसर खरोखरच पार्किंगमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलली, तरच नागरिकांना दिलासा मिळेल. अन्यथा दंडाच्या बातम्या वाढतील, आणि वाहतूक कोंडीही तितक्याच वेगाने.
खरे तर वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षकांची नियुक्ती व्हावी. नांदेड जिल्ह्यात अनेक पोलिस निरीक्षक रांगेत उभे आहेत. पण सहायक पोलीस निरक्षकांवर हा भारी भार देण्यात आलेला आहे.याचे गमक अद्याप कळले नसले तरी नाथनगरीत असलेल्या महाभागामुळेच असे घडले असेल अशी चर्चा पोलीस स्वतःच करीत आहेत.
