चढया दराने खताची विक्री केल्याने देगलूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

नांदेड –  देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. रासायनिक खतांची कमाल विक्री किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याप्रकरणी पाच कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देगलूर यांना तपासणीचे आदेश दिले होते. या तपासणी अहवालानुसार पांडुरंग कृषी सेवा केंद्र, गणेश कृषी सेवा केंद्र, जिजाई कृषी सेवा केंद्र, सोनी कृषी सेवा केंद्र आणि आनंद फर्टिलायझर्स, देगलूर या पाच कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या.
तपासणीदरम्यान रासायनिक खतांची कमाल किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, तसेच युरिया खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना विक्री न करणे अशा प्रकारच्या तक्रारींची पुष्टी झाल्याने सुनावणीनंतर संबंधित केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कुठेही रासायनिक खतांची जादा दराने विक्री होत असल्यास, विनापरवाना विक्री होत असल्यास किंवा खते उपलब्ध असूनही विक्री केली जात नसल्यास नागरिकांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी केवळ परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच खते व इतर निविष्ठांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!