खोटी नाणी खऱ्या नाण्यांना बाजारातून हद्दपार करतात त्याचे हे ज्वलंत उदाहरण
हनमंतवडिये (जिल्हा सांगली) गावात एका पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. क्रांतिवीरांगणा हौसाबाई पाटील यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार श्रीमती शिंदे आणि भगवानराव पाटील यांचे नावे दिला जाणारा पुरस्कार डॉक्टर शिवाजीराव कदम यांना देण्यात आला होता. कोण या हौसाबाई? या क्रांतिवीर नाना पाटील यांची कन्या! नाना पाटलांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान देऊन या भागात आपले प्रतिसरकार निर्माण केले. हौसाबाई यांनी आपल्या वडिलांच्या बरोबर स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला. ब्रिटिश सरकारच्या जुलमी कारभाराचे प्रतीक असलेला सरकारी डाक बंगला पेटवून आपल्या कार्याला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी अनेक सामाजिक कामामध्ये सहभाग घेऊन पहाडा एवढे काम उभे केले. त्यांचे पती भगवानराव उर्फ आप्पा बाप्पा हे देखील मोठे स्वातंत्र्य सैनिक होते.
ज्या हौसाबाईंनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष केला त्यांचा मुलगा एडवोकेट सुभाषराव पाटील व त्यांचे सर्व कुटुंबीय आजही पुरोगामी चळवळ पुढे नेण्यासाठी काम करीत आहेत. कार्यक्रमाला जाण्याअगोदर दारात असलेल्या एका झाडाला पाणी घालण्याचा कार्यक्रम झाला. ते झाड साधे नव्हते.ब्राह्मण न बोलावता, कोणताही विधी न करता हौसाबाई यांच्या अस्थी घरासमोरील खड्ड्यात पुरल्या होत्या. त्यात लावलेले ते वडाचे झाड आहे.
त्या भागात आज काय अवस्था आहे? जेल मधून बाहेर पडून गोळी लागली असतानाही हार न मानता आपली चळवळ चालू ठेवणारे वसंत दादा पाटील, राजाराम बापू पाटील तसेच छत्रपती शिवरायांचे आजचे सातार मधील वंशज काय करीत आहेत? त्यांच्यातील अपवादात्मक लोक बहुजन हिताचे काम करीत आहेत पण बाकीच्यांचे काय? याच हद्दीमध्ये मनोहर कुलकर्णी नावाचा एक कडवा ब्राह्मण आमच्या वारकरी संतापेक्षा विषमता व वर्ण श्रेष्ठत्व निर्माण करणाऱ्या मनूला श्रेष्ठ समजतो. तिरंगा झेंड्याचा तिरस्कार करतो, महात्मा फुले बद्दल अपशब्द वापरतो, तरीही हे काय करतात? आपल्याला मते मिळावीत यासाठी या कुटुंबातील लोकांनी मनोहर कुलकर्णी पुढे लोटांगण घातले. मनोहर कुलकर्णी सारखी माणसे पोसण्याचे आणि मोठे करण्याचे काम याच लोकांनी केले असे त्याच मातीतील लोक उघडपणे बोलतात. शिवरायांचे सातार मधील वंशज काय करीत आहेत. वडिलोपार्जित मालमत्ता सांभाळत, स्वतःची हिम्मत न दाखवता पुन्हा मान सन्मान मिळावा म्हणून पेशव्यांना कुर्णी साथ करीत आहेत. एवढी लाचारी का?
क्रांतिवीर नाना पाटील यांच्या वंशजांच्या कडून काय शिकायला पाहिजे? ज्या मातीत ब्रिटिशांना विरोध करण्याची धमक होती व आजही आहे त्याच मातीत आचार आणि विचाराने अभिमानाने जगणारे असे हे कुटुंब केंद्र स्थानी ठेवता येईल. अशा पद्धतीने जगणारी अठरापगड जमातीतील मोजकी कुटुंबे महाराष्ट्र भर आहेत. अशा कुटुंबांचा आदर्श समोर ठेवून बाकी सर्व बहुजन समाजातील लोकांना एकत्र येता येईल. प्रेरणा घेता येईल. बहुजनांच्या एकीतून या ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देता येईल. त्यातून बहुजनांचा आत्मसन्मान पुन्हा वृद्धिंगत करता येईल. आणि तसा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. ज्या समाजामध्ये आत्मसन्मान आहे तोच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होतो.
लोक विचारतात की क्रांतिवीर नाना पाटलांच्या नातवाप्रमाणे वागून काय मिळणार आहे? खरे तर ज्या इतर नेभळट व स्वार्थी लोकांनी लाचारी पत्करून सत्ता हस्तगत केली ती त्यांना आत्मसन्मान देते का? शिवाय अफाट मिळविलेली ती संपत्ती वर जाताना बरोबर घेऊन जाणार आहेत का?
एडवोकेट सुभाषराव पाटील, क्रांतिवीर नाना पाटलांचे नातू हे खरं बहुजन समाजाचे खणखणीत सोन्याचे नाणे आहे. अशी अनेक खणखणीत नाणी सगळ्या बहुजन समाजामध्ये विखुरलेली आहेत. पण अर्थशास्त्राच्या नियमानुसार खरी मौल्यवान नाणी दडवून माजघरात ठेवली जातात आणि खोटी नाणी व्यवहारात येतात. बहुजनांनो आपण या खऱ्या सोन्याच्या नाण्या भोवती जमु या. आपला उद्धार आपणच करूया. बाकीची नाणी खोटी असल्याने ती आभासी आहेत. कितीही मोठी वाटली तरी ती ब्राह्मणी व्यवस्थेच्या पालखीचे भोई म्हणून राहतील व त्यांची जागा इतिहासाच्या दृष्टीने केराची टोपली असेल!
जय बहुजन हिताय!
– सुरेश खोपडे
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्याना जन्म देणारी क्रांतीकारकांची भूमी काही अपवाद वगळता एवढी नेभळट आणि स्वार्थी कशी बनली?
