जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी
नांदेड -जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत ‘मुक्तीरथ’ला आज मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.
बालविवाह मुक्त भारत अभियान हे भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणारे राष्ट्रीय पातळीवरील जनजागृती व कृती अभियान आहे. १८ वर्षांखालील मुलींचे व २१ वर्षांखालील मुलांचे विवाह पूर्णतः थांबवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानाच्या माध्यमातून बालविवाहाची सामाजिक रूढी नष्ट करणे, मुलींचे शिक्षण टिकवून ठेवणे, बालकांचे आरोग्य व सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणे, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच समाजात जनजागृती वाढवणे, ही प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ, महिला व बालकल्याण जिल्हा परिषदेचे प्रशांत थोरात जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री. व्ही. एस. नरसीकर, परिविक्षा अधिकारी गजानन जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे, जनसेवा प्रतिष्ठानचे निलेश कुलकर्णी, श्रीमती आशा सूर्यवंशी, अरुण कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवून बालविवाह निर्मूलनाचा संदेश दिला. मुक्तीरथाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
