परभणी(प्रतिनिधी)-10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे विश्र्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याचा आरोप असलेला दत्ता सोपान पवार याने आज सकाळी आपल्या शेतातील बंद खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 13 महिन्यानंतर चार दिवसांपुर्वीच त्याची जामीन झाली होती आणि तीन दिवस तो गावात राहिला आणि चौथ्या दिवशी अर्थात आज सोमवारी त्याने आत्महत्या केली आहे.
दि.10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यावेळी पोलीसांनी केलेल्या हस्तक्षेपाचे पडसाद उमटले. जमावाने दगडफेक केली. त्यानंतर पोलीसांनी जमावातील काही जणांना शोधून शोधून मारले. स्थानिक गुन्हा शाखेचे तत्कालीन पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वात अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये फिरून लोकांना मारहाण करण्यात आली. त्यांची वाहने फोडली असे अनंत प्रकार घडले. या प्रकरणी पोलीसांनी मात्र परभणी जिल्ह्यातील मिर्झापुर येथील दत्ता सोपान पवार या व्यक्तीला अटक केली. ज्याने संविधान प्रतिकृतीची विटंबना केली होती.
या घटनेनंतर 16 डिसेंबर रोजी दंगल प्रकरणी अटक केलेला युवक सोमनाथ सुर्यवंशी कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यभर हे प्रकरण गाजले. ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सुध्दा परभणी येवून या घटनेबद्दल दु:ख तर व्यक्त केलेच आणि सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढली आणि पोलीसांविरुध्द गुन्हा दाखल झाला. या घटनेच्या संदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांना सभागृहात निलंबित केले होते. पण काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र प्रशासकीय न्याय प्राधीकरणाने पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांना सेवेत घेण्याचे आदेश दिल्यानंतर ते परभणी जिल्हा पोलीस दलात हजर झाले आहेत आणि जिल्ह्याची जबादारी सांभाळत आहेत. खरे तर त्यांची बदली बऱ्याच महिन्यांपुर्वी पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे झाली होती. पण त्यांना बदलीवर सोडण्यात आले नव्हते आणि परभणी हा प्रकार घडला.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणारा दत्ता सोपान पवार 13 महिन्यांपासुन तुरूंगात होता. चार दिवसांपुर्वीच त्याची जामीन झाली. तो आपल्या मिर्झापुर गावाकडे आला तीन दिवस गावात राहिला आणि आज सोमवारी सकाळी त्याने आपल्या शेतातील एका बंद खोलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. पोलीसांनी या आत्महत्येची दखल घेतली असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
परभणी संविधान प्रतिकृतीची विटंबना प्रकरण; आरोपीने केली आत्महत्या
