अभावावर प्रेम करा हा मंत्र बाबांनी दिला-कर्मयोगी प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

नांदेड (प्रतिनिधी)-स्वर्गीय बाबा आमटे हे माझे जन्मदाते असले तरी निराधारांसाठी ते परमेश्वरच होते. निःस्पृह व सेवाभावी वृत्तीने त्यांनी कुष्ठरोग्यांचा योगक्षेम चालवला व त्यांना सन्मानाने आनंदवनात उभे केले आणि सगळ्या विश्वाचे लक्ष आनंदवनाकडे केंद्रित झाले, मुळातच संवेदनशील वृत्तीच्या बाबांनी रंजल्या गांजल्यांमध्ये परमेश्वर पाहिला आणि अभावावर प्रेम करा हा मंत्र बाबांनी दिला, असे प्रतिपादन पद्मश्री प्रकाश आमटे यांनी केले.
गडचिरोली जिल्ह्यातील  हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात पार पडलेल्या पाचव्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकीय भाषणात ते बोलत होते. विशेष म्हणजे लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेनंतर तेथे पार पाडणारे हे पहिलेच साहित्य संमेलन  होते. नागपूरच्या बालाजी साहित्य संघाने हे संमेलन आयोजित केले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष बापू दासरी आणि विशेष अतिथी देवीदास फुलारी यांचे हस्ते प्रकाश आमटे व सौ. मंदाकिनी आमटे यांना २०२५ चा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  प्रारंभी, स्वागतगीत आणि मान्यवरांच्या सत्कारानंतर स्वागताध्यक्ष सरोज आंदनकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मंदाताई आमटे यांनी आपल्या जीवन प्रवासाविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. विशेष अतिथी म्हणून बोलताना साहित्यिक देवीदास फुलारी यांनी बाबा आमटे आणि नरहर कुरुंदकर, राजें मधुकरराव देशमुख, सुधाकरराव डोईफोडे यांच्या भेटीगाठी आणि वैचारिक चर्चेवर सुंदर भाष्य केले.  श्रम ही है श्रीराम हमारा हे बाबांच्या जीवनाचे ब्रीद होते असे सांगून, बाबांच्या आणि आनंदवनाच्या आठवणी अधोरेखित केल्या. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संमेलनाध्यक्ष बापू दासरी यांनी आजची सामाजिक स्थिती व आजच्या महिलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आणि आजच्या साहित्यिकांसमोरचे आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले. नवोदित साहित्यिकांनी सकस साहित्याचे वाचन केल्यानंतर लिहावे असा मनोदय व्यक्त करत साहित्य निर्मितीचे उजेडाशी नाते असते आणि उजेडाला कोणतीही जात  किंवा धर्म पंथ नसतो. शुद्ध प्रकाश हाच त्याचा परिचय असतो, असे प्रतिपादन केले. त्यांच्या अनेक कविता गझल शेरोशायरी युक्त अर्ध्या तासाच्या  भाषणास  रसिकांनी भरभरून दाद दिली.  यावेळी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरून अनेक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन दिवसीय वास्तव्यात रसिकांनी हेमलकसा येथील प्राणी संग्रहालय, त्रिवेणी संगम आणि इतर प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.
या राज्यस्तरीय संमेलनात मान्यवरांच्या हस्ते तीन पुस्तकांचे प्रकाशन आणि दोन जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. या संमेलनात मराठवाड्याचे प्रतिनिधित्व कवी प्रभाकर साळेगावकर माजलगाव व महेश मोरे नांदेड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सोनाली धनमणे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!