नांदेड, दि. 3 डिसेंबर :- भारत निवडणूक आयोगाचे पत्र 14 नोव्हेंबर 2025 अन्वये जाहीर करण्यात आलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या सुधारित मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय व सर्व तहसिल कार्यालय येथे मतदारांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांना सदर मतदार यादी नांदेड जिल्ह्याच्या https://nanded.gov.in/en/document-category/graduate-constituency-election या संकेतस्थळावर सुद्धा पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील 23 हजार 867 पुरूष, 6 हजार 264 महिला व 4 इतर असे एकुण 30 हजार 135 पदवीधर मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
सदर पदवीधर प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक 3 डिसेंबर 2025 ते 18 डिसेंबर2025 असा आहे. या कालावधीमध्ये दावे व हरकती स्विकारण्यासाठी मतदान केंद्रनिहाय पदनिर्देशीत अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांनी पूर्ण वेळ मतदान केंद्रावर उपस्थित राहून दावे व हरकती स्विकारणेबाबत त्यांना निर्देश देण्यात आले आहेत.दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्याचा दिनांक 5 जानेवारी 2026 (मंगळवार) हा असून पदवीधर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक 12 जानेवारी 2026 (सोमवार) रोजी करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांना याद्वारे आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी प्रारूप मतदार यादीमध्ये आपली नावे व इतर तपशील अचूक असल्याबाबतची खात्री करावी. सदर प्रारूप मतदार यादीमध्ये काही बदल, दुरूस्ती अथवा सुधारणा करावयाची असल्यास किंवा नाव समाविष्ट करावयाचे असल्यास संबंधित मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन मतदान केंद्रस्तरीय पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे किंवा संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा पदनिर्देशित अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
