ग्रामीण भागातील वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार

नांदेड(प्रतिनिधी)-ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यात यावी असा शासन निर्णय ग्राम विकास विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयावर ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी शुभम घुगे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
राज्यात आणि शहरात अनेक भागातील अनेक गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावे आहेत. या बाबत आता ती नावे महापुरूषांच्या नावावर, लोकशाही मुल्यांशी असावी असा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 10 डिसेंबर 2020 रोजी जारी केला होता. त्यानंतर 28 एप्रिल 2021 रोजी त्या संदर्भाचे परिपत्रक काढण्यात आले होते. तरी पण ती नावे आहे तशीच सुरू आहेत. ही नावे बदलण्यासाठी 28 एप्रिल 2021 चे परिपत्रक वाचा असे लिहिले आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याने हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाही. राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होवून राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून महापुरूषांची नावे अथवा लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे द्यावीत.
त्यासाठी वस्ती किंवा रस्त्यांचे नाव बदलण्यासंदर्भाने ग्रामसभेत ठराव पास करून घ्यावा आणि तो प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवावा. गटविकास अधिकारी यांनी तो ठराव मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तो प्रस्ताव तपासून संबंधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी द्यावी. हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202510091330383220 प्रमाणे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!