
नांदेड- धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील अनेक गावांमध्ये बॅकवॉटरमुळे शेती पाण्याखाली गेली असून दिग्रस व चौंडी या गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. या परिस्थितीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), धुळे यांना तत्काळ धर्माबादकडे रवाना होण्याचे आदेश दिले. आदेशानुसार एसडीआरएफ बचाव पथक आज सकाळपासून धर्माबाद येथे उपस्थित राहून कार्यवाही करत आहे.
दिग्रस गावात पुरात अडकलेल्या दिव्यांग, वृद्ध तसेच केवळ दोन महिन्यांच्या बाळासह आई व इतर नागरिक मिळून सुमारे 16 पुरपीडितांचा यशस्वी बचाव करण्यात आला. हे कार्य कमांडर प्रशांत राठोड, पोलीस निरीक्षक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल तुकडी क्र. 3 यांच्या नेतृत्वाखाली, उपविभागीय अधिकारी धर्माबाद स्वाती दाभाडे व तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडले.

यासोबतच चौंडी गावातील पाच पुरपीडित नागरिकांनाही शोध व बचाव कार्य करून सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.
दरम्यान, गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
