‘स्वारातीम’ विद्यापीठातील ६ कर्मचारी सेवानिवृत्त

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक (संलग्निकरण) विभागाचे अधीक्षक संजयकुमार नरहरराव गाजरे, स्थावर विभागातील सहा. अधीक्षक सुधाकर देविदासराव शिंदे, लेखा विभागातील रोखपाल शिवाजी किशनराव हंबर्डे, लेखापाल शिवाजी गणपतराव देशमाने (विद्यापीठ निधी), शैक्षणिक मान्यता विभागातील वरिष्ठ लिपिक अशोक प्रल्हादराव मुंढे आणि याच विभागातील वरिष्ठ लिपिक बियाबानी मुन्तेजबोद्दिन मोहजेबुद्दिन हे सहाही कर्मचारी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दि. ३ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी या सेवानिवृत्त सत्कारमूर्तीचे मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांची विशेष उपस्थिती होती.

 

संजयकुमार गाजरे यांनी विद्यापीठाला २७ वर्षे ९ महिने सेवा दिली आहे. या काळात त्यांनी विद्यापीठातील परीक्षा विभाग, आस्थापना विभाग, निवडणूक विभाग, शैक्षणिक विभागातही आपली सेवा दिली.

 

सहा. अधीक्षक सुधाकर शिंदे हेही नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. शिंदे यांनी कनिष्ठ लिपिक पदापासून ते सहा. अधिक्षक पदापर्यंतची अशी एकूण २५ वर्ष सेवा त्यांनी विद्यापीठास दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लेखा विभाग, परीक्षा विभाग, स्थावर विभाग इ. विभागामध्ये आपली सेवा दिली.

 

रोखपाल शिवाजी हंबर्डे यांनी विद्यापीठाला २६ वर्षे ६ महिने सेवा दिली आहे. २००२ ते २००८ या कालावधीमध्ये त्यांनी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

 

लेखापाल (विद्यापीठ निधी) शिवाजी देशमाने यांनी विद्यापीठाला २५ वर्षे सेवा दिली आहे.

 

वरिष्ठ लिपिक अशोक मुंढे हेही नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी एकूण २८ वर्ष ११ महिने सेवा विद्यापीठाला दिली आहे. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अस्थापना विभाग, पदव्युत्तर विभाग, परीक्षा विभाग, दीक्षान्त विभाग, शैक्षणिक मान्यता विभाग इ. विभागामध्ये काम केले आहे.

 

वरिष्ठ लिपिक बियाबानी मुन्तेजबोद्दिन हेही नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी एकूण २९ वर्ष सेवा विद्यापीठाला दिली आहे.

 

या समारंभ कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांनी विद्यापीठास दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल कौतुक केले आणि त्यांना पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमय लाभो अश्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन व कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनीही या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमय लाभो अश्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम. के.पाटील, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील अब्दुल करीम यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनीही या सर्वांना पुढील जीवन सुखी, समृद्धी व आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!