नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा नवरा आणि सासुबाई या दोघांना कंधार जिल्हा न्यायालयाने जबर शिक्षा ठोठावली आहे.सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलेला आहे. या खटल्याचा निकाल जवळपास 8 वर्षानी आला.
दि.13 ऑगस्ट 2016 रोजी ज्योती प्रकाश सोनटक्के ही विवाहिता आपल्या माहेरच्या घरी असतांना तिचा नवरा तेथे आला आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला आई-वडीलांसह इतर नातलगासमक्ष शिवीगाळ करू लागला. नवरा प्रकाश सोनटक्के हा लग्नानंतरच्या काही दिवसापासून हा प्रकार करतच होता. पण त्या दिवशी आई-वडील आणि इतर नातलगांसमोर नवऱ्याने केलेला अपमान ज्योतीला सहन झाला नाही आणि तिने आपल्या आई-वडीलांच्याच घरी स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून घेवून स्वत:ला जाळून घेतले. आपली दोन लेकरे एक मुलगा आणि एक मुलगी यांना सोडून ज्योती निघून गेली.
याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात ज्योतीचे बंधू धम्मानंद चितोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 498, (अ) नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक सूर्यकर यांनी तपास पुर्ण केला. जिल्हा न्यायालय कंधार येथे हा खटला चालला. त्यात 10 साक्षीदारांनी न्यायालयात आपले जबाब नोेंदवले. समोर आलेल्या पुराव्याचा आधार सोबतच ज्योती प्रकाश सोनटक्केने मृत्यूपुर्वी दिलेला जबाब ग्राहय माणून कंधारच्या जिल्हा न्यायाधीशांनी ज्योतीचा नवरा प्रकाश सोनटक्के यास भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार 5 वर्ष कैद आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. कलम 498(अ) यानुसार 1 वर्ष 6 महिने कैद आणि 25 हजार रुपये रोख दंड ठोठावला. तसेच मयत ज्योतीच्या सासुबाई रत्नपाला सोनटक्के यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 498(अ) प्रमाणे 1 वर्ष 6 महिने सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. आपल्या सुनबाईच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सासू आणि त्यांच्या मुलाला मिळून 1 लाख 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम वसुल झाल्यानंतर त्यातील 75 हजार रुपये मयत ज्योतीच्या लेकरांना देण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश कंधार यांनी केले आहे. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू ऍड.महेश कागणे यांनी मांडली. सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार प्रविण सुरनर यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पाहिले.