सभागृह झाले हाऊसफुल.. नांदेड – व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२६-२७ अंतर्गत २६ नोव्हेंबर रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सादर झालेल्या ‘बंड्या तुमच्या उरावर’ या नाटकाला नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाटकाच्या प्रयोगासाठी प्रेक्षागृह तुडुंब भरले होते. जागा अपुरी पडल्याने अनेक नाट्यरसिकांनी उभे राहून नाटकाचा आनंद घेतला. विनोदाचे अचूक टायमिंग, खुसखुशीत संवाद आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः हसवून हसवून लोटपोट केले. टाळ्या आणि हास्याच्या गजरात संपूर्ण प्रेक्षागृह दुमदुमून गेले. नाट्यनाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड प्रस्तुत ‘बंड्या तुमच्या उरावर’ हे नाटक केवळ मनोरंजन करणारे नसून अंधश्रद्धेवर मार्मिक भाष्य करणारे आहे. बंड्या हे खोडकर वृत्तीचे, अत्यंत हुशार, चपळ बुद्धीचे आणि धाडसी मुलाचे पात्र आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यात गुरफटत चाललेल्या आपल्या आईला या अंधश्रद्धेच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करतो. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि शिक्षणाच्या जोरावर तो समाजाला एक महत्त्वाचा संदेश देतो. विनोदाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याची ताकद या नाटकात प्रभावीपणे दिसून येते. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन सुदाम केंद्रे यांनी केले आहे. दत्ता, मीरा, मास्टर, मोरे काका, निक्या, माऊ, शुभम, यशवंत, गल्ली बाबा आणि चेला अशा विविध व्यक्तिरेखांमधून कलाकारांनी रंगतदार अभिनय सादर केला. कपिल ढवळे, प्रियंका गायकवाड, शाम डुकरे, शुभम शेळके, अक्षय राठोड, स्वरा देशमुख, संदेश महाबळे आणि कृष्णा कदम यांनी आपापल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या. संगीत संयोजन इंद्रदीप, प्रकाश योजना बबन वोगले यांनी सांभाळली. नाटकाला अगदी साध्या पण अर्थपूर्ण प्रतिकात्मक नैपथ्य सजावटी ची जबाबदारी संदेश महाबळे यांनी पार पाडली. रंगभूषा व वेशभूषा गायत्री तरतरे आणि स्वरा देशमुख यांनी केली. रंगमंच सहाय्यक म्हणून चक्रधर खानसोळे, सुमित टिपरसे आणि पूजा सोनवणे यांनी सहकार्य केले. एकीकडे खळखळून हसवणारे प्रसंग आणि दुसरीकडे अंधश्रद्धेविरुद्ध विचार करायला लावणारा आशय, यांचा सुंदर मिलाप या नाटकात अनुभवायला मिळाला. कलाकारांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नाटकाच्या शीर्षकात बंड्या तुमच्या उरावर असला, तरी प्रत्यक्षात मात्र या बंड्याला नाट्यरसिकांनी आपल्या डोक्यावर घेतल्याचे चित्र शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पाहायला मिळाले. दि. ३० नोव्हेंबर सोमवार रोजी ठीक सायंकाळी ७ वा. ‘सहज सुचलं म्हणून’ हे नाटक सादर होणार आहे तरी नांदेडकर नाट्य रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने या नाटकांचा लाभ घेऊन नाट्य कलावंतांना प्रोत्साहित करावे असे आव्हान संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 164 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रेमाचा अतिरेक, गैरसमज आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत यांचा वेध घेणारे अकल्पित स्मृती नाटक सादर