उद्या नटसम्राट या नाटकाचे सादरीकरण नांदेड – 65 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत दि. २५ नोव्हेंबर रोजी ‘अकल्पित स्मृती’ हे नाटक सादर करण्यात आले. अकल्पित स्मृती’ हे प्रेम, संशय, नातेसंबंध, मानवी स्वभाव आणि आयुष्यातील अनपेक्षित घटनांमधून निर्माण होणाऱ्या भावनिक गुंतागुंतीचा वेध घेणारे नाटक होते. लेखक व दिग्दर्शक महेश रोडे यांनी या नाटकातून मानवी आयुष्यातील चांगल्या-वाईट, कटू-गोड स्मृतींचे महत्त्व अधोरेखित केले. माणसाचे आयुष्य हे अनेक चांगल्या, वाईट, कटू आणि गोड स्मृतींच्या चक्रव्यूहातून प्रवास करत असते. काही स्मृती जपण्यासारख्या असतात, तर काही विसरणे हितकारक असते. मात्र, कधी कधी विसरता न येणाऱ्या स्मृती आणि आयुष्यात घडणाऱ्या अकल्पित घटना माणसाला एका वेगळ्याच मानसिक संघर्षात घेऊन जातात. हाच या नाटकाचा मुख्य गाभा आहे. प्रेम ही अतिशय पवित्र आणि जीवनावश्यक भावना असली, तरी प्रेमाचा अतिरेक आयुष्याला घातक ठरू शकतो. अतिताईपणा, आक्रस्ताळेपणा आणि रागीट स्वभाव यांसारख्या प्रवृत्ती नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतात. अशा परिस्थितीत जवळची माणसेच आधार देतात की नात्यांमधील गुंतागुंत अधिक वाढवतात, याचा वेध नाटकातून घेतला आहे. नाटकात आदिनाथ शास्त्री आणि त्यांची पत्नी नंदिनी, वैदेही आणि तिचे पती डॉक्टर सहस्रबुद्धे ही चार प्रमुख पात्रे आहेत. आदिनाथ आणि नंदिनी यांच्या वैवाहिक नात्यात प्रेमाच्या अतिरेकामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. त्यातून नंदिनीच्या आयुष्यात भावनिक संघर्ष उभा राहतो. डॉक्टर सहस्रबुद्धे हे नंदिनीच्या कटकारस्थानात सामील होतात, तर नंदिनीच्या अतिताईपणामुळे वैदेही नेमके काय करते, हे जाणून घेण्याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. नाटकातील रहस्य टिकवून ठेवण्यात चंदन सेठ, रंगमंचावरील नर्स आणि डॉक्टर पाठक यांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. नेमका गुन्हेगार कोण, नात्यांमागील सत्य काय आणि या सगळ्या घटनांचा शेवट कसा होणार, याची उत्कंठा नाटकाच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते. नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात रहस्याचा उलगडा होताना प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो. प्रेम, विश्वास, संशय, भावनिक गुंतागुंत आणि अनपेक्षित रहस्य यांची सांगड घालणारे ‘अकल्पित स्मृती’ हे नाटक प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच देणार नाही, तर मानवी नात्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही देईल, अशी अपेक्षा आहे. नाटकाची तांत्रिक व कलात्मक टीम : लेखक व दिग्दर्शक : महेश रोडे कलाकार : आदिनाथ शास्त्री – महेश रोडे, वैदेही – सोनी मुलंगे (पाठक), डॉ. सहस्रबुद्धे – डॉ. गुरुदत्त चौधरी, नंदिनी – योगिता खंदारे, सत्यजित राणे – रणजित आगळे, शालिनी – प्रिया कत्ते, डॉ. पाठक – स्वतः डॉ. पाठक. प्रकाशयोजना : बालाजी दामुके व पृथ्वीराज देशमुख संगीत : व्यंकट वडसकर व उमेश रोडे नेपथ्य : नारायण दुडके व सतीश कुंदकर रंगभूषा : श्रद्धा वडसकर, शुभम मुलंगे व श्रद्धा चौधरी वेशभूषा : दिपाली रोडे, स्नेहल पाटील व यश उमरीकर रंगमंच व्यवस्था : सौरभ कुंदकर, आरोह रोडे, शुभदा खरजुले, मनोरमा खंदारे व भाऊसाहेब पाटील. उद्या दि. २७ नोव्हेंबर रोजी ठीक सायंकाळी ७ वा. महाराष्ट्रभर गजलेले नटसम्राट हे नाटक सादर होणार आहे तरी नांदेडकर नाट्य रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने या नाटकांचा लाभ घेऊन नाट्य कलावंतांना प्रोत्साहित करावे असे आव्हान संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 14 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मृत्यूची भीती आणि जगण्याची इच्छा यांचा संघर्ष उलगडणारे भयरात्र नाटक