नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी लीला आर्ट्स फाउंडेशन, नांदेड या संस्थेच्या वतीने कुंपणापलीकडले या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सायंकाळी ७ वाजता झालेल्या या प्रयोगातून मतिमंद मुलांच्या मानसिकतेतील बदल, त्यांच्या भावनिक व शारीरिक गरजा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कौटुंबिक संघर्षाचे संवेदनशील चित्रण करण्यात आले. डॉ. जगन्नाथ (नाथा) चितळे लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात लहानपणी निरागस आणि शांत वाटणाऱ्या मतिमंद मुलांमध्ये वयात येताना होणारे मानसिक व शारीरिक बदल, वाढत्या भावना, वासना, उर्मी आणि सामाजिक संकेतांची जाणीव नसल्यामुळे निर्माण होणारी अस्वस्थता यांचा वेध घेण्यात आला आहे. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचण येणाऱ्या मुलांच्या वर्तनाचा परिणाम केवळ त्या मुलांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबावर कसा होतो, हा महत्त्वाचा प्रश्न नाटकातून मांडण्यात आला आहे. कुटुंबातील एखाद्या मुलाच्या असामान्य वर्तनामुळे घरातील स्त्रिया, बहिणी आणि आई यांच्या मनात निर्माण होणारी भीती, असुरक्षितता आणि भावनिक ताण यांचेही नाटकात चित्रण आहे. अशा परिस्थितीत कुटुंबासमोर कोणताही सोपा किंवा निर्दोष उपाय उपलब्ध नसतो. औषधोपचार, बंधने, समजाव्यवस्था किंवा कठोर शिक्षा यांसारख्या उपायांमागील असहायता आणि मानसिक संघर्ष नाटकातून अधोरेखित केला आहे. समाज अशा संवेदनशील प्रश्नांकडे सहानुभूतीने पाहण्याऐवजी अनेकदा संशय, कुजबुज आणि तिरस्काराने पाहतो. मात्र, अशा समस्यांकडे केवळ नैतिकतेच्या किंवा सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून न पाहता मानवी संवेदना, वैद्यकीय वास्तव आणि कुटुंबाची परिस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचा विचार नाटकातून मांडण्यात आला आहे. नाटकात आप्पा यांच्या भूमिकेत गोविंद जोशी, माई यांच्या भूमिकेत मंगला खानापुरे, श्रावण (मतिमंद मुलगा) यांच्या भूमिकेत उमेश देशमुख, रश्मी यांच्या भूमिकेत रागेश्री जोशी, अरविंद यांच्या भूमिकेत अक्षद चंद्रवंशी, स्नेहा यांच्या भूमिकेत माधुरी लोकरे, चंदाबाई यांच्या भूमिकेत स्नेहा कदम, मिस्टर नेने यांच्या भूमिकेत प्रशांत दिग्रसकर, न्यायाधीशांच्या भूमिकेत डॉ. जगन्नाथ (नाथा) चितळे आणि पेटूवाल यांच्या भूमिकेत शुभम तिवाडी यांनी भूमिका साकारल्या. तसेच चाळकरींच्या भूमिकेत आयुष गावंडे, ऋषिकेश कल्याणकर, नागेश लोकडे, श्रीगणेश हंबर्डे आणि रोहित जोंधळे यांनी सहभाग घेतला. नाटकाचे नेपथ्य नागेश लोकडे व बालाजी पांयाळ यांनी, प्रकाशयोजना माणिक शिरोत व सुमित टिपरसे यांनी, रंगभूषा गजस्विनी देलमाडे यांनी, वेशभूषा डॉ. नेहा चितळे यांनी, तर संगीत अमोल गादेकर यांनी सांभाळले. मतिमंद मुलांच्या मानसिक आणि भावनिक प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजून घेणे, कुटुंबाला आधार देणे आणि अशा परिस्थितीकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे, हा विचार प्रेक्षकांसमोर मांडत ‘कुंपणापलीकडले’ हे नाटक सामाजिक वास्तवाचे अस्वस्थ करणारे दर्शन घडवते. आज दि २४नोव्हेंबर रोजी ठीक सायंकाळी ७ वाजता ओम प्रतिष्ठान परभणी निर्मित महेश रोडे लिखित आणि दिग्दर्शित अकल्पित स्मृती हे नाटक सादर होणार आहे तरी जास्तीत जास्त नांदेडकर नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 11 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्त्रीवरील अत्याचार, असुरक्षितता आणि सामाजिक मानसिकतेवर भाष्य करणारे गर्भ नाटक;आज लीला आर्ट फाऊंडेशन निर्मित कुंपणा पलीकडले हे नाटक