नवीन नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या हिवाळी परीक्षा २०२६ च्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी विद्यापीठाशी संलग्नित पाच महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांना आज अचानक भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यामध्ये ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वसंतनगर (कोटग्याळ), श्री संत गाडगे महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोहा, श्री शिवाजी महाविद्यालय, कंधार, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, मुखेड आणि शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय, मुखेड या परीक्षा केंद्रांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान कुलगुरूंनी परीक्षा कक्षांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था, ऑनलाइन प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्याची प्रक्रिया, उत्तरपत्रिकांचे संकलन व सीलबंद करण्याची कार्यपद्धती तसेच परीक्षेच्या सुरळीत संचालनासाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधांची तपासणी केली. ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा कक्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले, त्या महाविद्यालयांनी त्याच दिवशी आवश्यक ती व्यवस्था पूर्ण करावी, असे सुस्पष्ट निर्देश कुलगुरूंनी दिले. या त्रुटींचे तातडीने निराकरण न झाल्यास संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, प्रश्नपत्रिका वितरणाची गोपनीयता आणि उत्तरपत्रिकांच्या सुरक्षित हाताळणीला विशेष महत्त्व असल्याचे कुलगुरूंनी नमूद केले. आवश्यक सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून परीक्षेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडणाऱ्या महाविद्यालयांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराविना, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध असल्याचे या भेटीदरम्यान अधोरेखित करण्यात आले. Kanthak Suryatal Post Views: 27 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राधाई महाविद्यालयात १५७ शिक्षकांना निवड श्रेणी प्रशिक्षण