मुदखेड व नायगाव पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; पोलिसांकडून तपास सुरू नांदेड (प्रतिनिधी) – बँक ग्राहकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत फसवणूक करण्याचे प्रकार जिल्ह्यात समोर आले आहेत. मुदखेड येथे बँकेच्या कर्मचाऱ्याने कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल २ लाख ४३ हजार ६३६ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या घटनेत नायगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून एटीएम कार्डची अदलाबदल करत ग्राहकाच्या खात्यातून १४ हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुदखेडमध्ये बँक कर्मचाऱ्याकडून २.४३ लाखांचा अपहार मुदखेड येथे ६ नोव्हेंबर २०२४ ते ३ मार्च २०२५ या कालावधीत भारत फायनान्शियल इन्क्लुजन बँकेच्या मुदखेड शाखेत कार्यरत असलेला आरोपी नागेश शंकर शिंदे रा. मांजरम याने कर्जदार लोकांकडून कर्जाची रक्कम वसूल केली. मात्र, वसूल केलेली एकूण २ लाख ४३ हजार ६३६ रुपयांची रक्कम बँकेच्या कार्यालयात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी जवळ ठेवून फिर्यादीसह इतर लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारत फायनान्शियल इन्क्लुजन बँक, शाखा मुदखेडचे शाखा व्यवस्थापक व फिर्यादी नितीन शिवाजीराव वाघमारे (वय ३० वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि राठोड करीत आहेत. नायगावमध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करून १४ हजारांची चोरी दुसरी घटना नायगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममध्ये २८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान घडली. फिर्यादी एटीएममध्ये बॅलन्स चेक करीत असताना दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून त्यांच्या हातातील एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर संबंधित कार्डचा वापर करून वेगवेगळ्या एटीएममधून १४ हजार रुपये काढून घेत फिर्यादीची फसवणूक केली.याप्रकरणी फिर्यादी शंकर धोंडिबा शिंदे (वय ५८ वर्षे, रा. मांजरम) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ पवार करीत आहेत. बँक ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज बँकिंग व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. एटीएममध्ये व्यवहार करताना आपले कार्ड अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नये, पिन क्रमांक कोणालाही सांगू नये आणि कार्डची अदलाबदल होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बँकेच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पावती व अधिकृत नोंदी तपासाव्यात, असे आवाहन या घटनांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरत आहे. Kanthak Suryatal Post Views: 72 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूरमध्ये जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!