अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणातून घडविणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड; पोलीस दलात हळहळ

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार रमेश ज्ञानू कांबळे (वय56) यांचे काल आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने नांदेड पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन घडविणारा एक उत्कृष्ट प्रशिक्षक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

रमेश कांबळे हे पोलीस दलात केवळ कर्मचारी म्हणून कार्यरत नव्हते, तर एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक पोलीस कर्मचारी आज सेवेत कार्यरत आहेत. प्रशिक्षण देण्याची त्यांची हातोटी, शिस्तीचा आग्रह आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांना पोलीस दलात विशेष मानाचे स्थान होते. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ते गुरुजीच होते.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे मूळ गाव लोहाळे असून, आज सायंकाळी ४ वाजता लोहा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलीस दलाने एक मार्गदर्शक आणि अनुभवी प्रशिक्षक गमावला आहे. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार कांबळे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, दिवंगत रमेश कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!