१ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; काही जुगारी अंधाराचा फायदा घेत पसार मुदखेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात नांदेड पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, या मोहिमेंतर्गत मुदखेड पोलिसांनी उमाटवाडी शिवारातील ‘अंदर-बाहर’ नावाच्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी मुदखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या आदेशानुसार विशेष पोलीस पथक परिसरात गस्त घालत असताना उमाटवाडी गावाच्या गायरान जमिनीतील एका लिंबाच्या झाडाखाली काही जण पैसे लावून अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत रात्रीच्या सुमारास संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी काही जण गोल रिंगण करून पत्ते आणि पैशांवर जुगार खेळताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. मात्र, पोलिसांनी घेराव घालून चौघांना जागीच ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये जगन संभाजी सोमवारे (वय ४६, रा. येळी, ता. लोहा), भुजंग केशव शिंदे (वय २३, रा. रोही पिंपळगाव, ता. मुदखेड), संभाजी गंगाधर जाधव (वय २४, रा. डोनवाडा, ह.मु. माळकौठा, ता. मुदखेड) आणि कृष्णा दिगंबर कल्याणे (वय २४, रा. मुगट, ता. मुदखेड) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून ६ हजार ६०० रुपये रोख, अंदाजे १ लाख ७० हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अर्चना पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मुदखेडचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजेश नंद, सुरेश जाधव, आकाश सरोदे आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू राहणार असून, अशा अवैध हालचालींची माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 12 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धर्माबादमध्ये घरफोडी; २.५९ लाखांचा ऐवज लंपास;उमरीत मायक्रोफायनान्स कंपनीची ३.५५ लाखांची फसवणूक