नांदेडमध्ये स्वयंभू नेत्याचा प्रताप: शेतकऱ्याची व्यथा मांडणे अन् दैवताच्या अपमानावर सवाल विचारणे ठरला मोठा अपराध; सोनखेड पोलिसांची तत्परता थक्क करणारी! नांदेड (प्रतिनिधी) – लोकशाहीत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला फोन करून गावाची आणि शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती मांडणे, तसेच आपल्या मराठा समाजाच्या दैवताचा अपमान का केला, असा साधा आणि रास्त सवाल विचारणे हा किती गंभीर अपराध ठरू शकतो, याचे एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण नांदेड जिल्ह्यात समोर आले आहे. नांदेडचे स्वयंभू नेते हेमंत पाटील साहेबांना पिंपळगाव येवला (ता. लोहा) येथील भगवान बाबूराव येवले या एका साध्या शेतकऱ्याने फोन लावण्याचे धाडस केले, आणि त्या बदल्यात नेत्याचा उफाळून आलेला पराक्रम व पोलीस प्रशासनाने दाखवलेली कौतुकास्पद तत्परता पाहून संपूर्ण महाराष्ट्राची मान गर्वाने नव्हे, तर लाजेने खाली जावी असाच प्रकार घडला आहे! फोनवर शाही पाहुणचार आणि आईवरून शिवीगाळ मुंबईत पार पडलेल्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अत्यंत सभ्य व उच्च दर्जाच्या भाषेचा (बैमाना, कुत्र्या इत्यादी) वापर केला होता. आपल्या दैवताचा असा घोर अपमान झाल्यामुळे व्यथित झालेल्या भगवान येवले या शेतकरी पुत्राने २२ तारखेला थेट नांदेडचे नेते हेमंत पाटील यांना फोन जोडला. फोनवर गावातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती मांडणे आणि रामदास कदम यांच्या त्या गलिच्छ वक्तव्याबद्दल विचारणा करणे या शेतकरी पुत्राला भलतेच महाग पडले. जनतेचे सेवक असलेल्या या नेत्याला साध्या शेतकऱ्याने सवाल विचारलेला अजिबात सहन झाला नाही. संतापाने लालबुंद झालेल्या नेतेजींनी थेट फोनवरच शिव्यांचा वर्षाव करत, तुझ्या घरात घुसून मारतो आणि तुला जिवे मारतो, अशी थेट जिवे मारण्याची धमकी त्या शेतकऱ्याला देऊन टाकली! लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकणे म्हणजे नक्की काय, याचे जणू प्रात्यक्षिकच नेत्यांनी फोनवरून दाखवून दिले. पोलीस खात्याची अभूतपूर्व तत्परता! नेतेजींचा राग केवळ फोनवरील शिवीगाळाने शांत झाला नाही. लागलीच दुसऱ्या दिवशी सोनखेड पोलीस ठाण्याचे एपीआय भागवत नागरगोजे साहेब कायद्याची आदरयुक्त अंमलबजावणी करण्यासाठी कमालीचे तत्पर झाले. एरव्ही गावातील चोऱ्या, दरोडे किंवा गुन्हेगारांचा शोध घेताना तासन तास लावणाऱ्या पोलिसांची दोन कॉन्स्टेबल आणि दोन होमगार्डची फौज थेट भगवान येवले यांच्या दारात अवतरली. त्या निष्पाप शेतकऱ्याला पायात चप्पलही घालू न देता, कॉलरला पकडून उचलून थेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. पोलीस ठाण्यातील विशेष पोलिसी खाक्या पोलीस ठाण्याच्या चार भिंतींच्या आत या साध्या शेतकऱ्याला नेऊन त्याच्या हाता-पायावर सुंदऱ्या मारेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. अहो साहेब, माझी चूक काय? मी केलं काय? असा आर्जवी सवाल विचारणाऱ्या शेतकऱ्याला एपीआय नायर साहेबांनी अत्यंत वैधानिक उत्तर दिले! मारहाण सुरू असतानाच थेट हेमंत पाटील साहेबांना फोन लावून देण्यात आला आणि चल, साहेबांची माफी माग! नाहीतर तुझ्या घरात घुसून तुला मारू! असा प्रेमळ सल्ला देण्यात आला. लाठ्यांचा मार आणि नेत्याच्या धमकीपुढे अखेर त्या असहाय्य शेतकऱ्याला फोनवर माफी मागावी लागली. एसपी ऑफिसमधील कायदेशीर नाटक अन् कोरा बॉन्ड एवढ्यावरच हे न्यायसत्र थांबले नाही. तिथून भगवान येवले यांना थेट नांदेडच्या एसपी ऑफिसमध्ये हजर करण्यात आले. तिथे पोलीस प्रशासनाच्या आणि नेत्यांच्या अत्यंत पारदर्शक दबावाखाली कोऱ्या बॉन्डवर सह्या उरकून घेण्यात आल्या. नेत्याचे पीए शंकर मोरे यांच्यामार्फत तातडीने तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आणि उलट त्या मार खालेल्या शेतकऱ्याकडूनच मीच आमदार/नेते हेमंत पाटलांना शिवीगाळ केली असा खोटा आणि बनावट जबाब जबरदस्तीने लिहून घेण्यात आला. माझ्याकडे फोन रेकॉर्डिंगचा सर्व पुरावा उपलब्ध आहे. जर मी शिवीगाळ केली असेल, तर त्यांनी पुरावा दाखवावा, मला थेट फासावर द्यावे! असे उघडे आव्हानच आता हा शेतकरी पोलीस आणि नेत्यांना देत आहे. मुख्यामंत्र्यांकडे न्यायाची हाक अन् गंभीर इशारा मी एक शेतकरी पुत्र आणि मनोज जरांगे पाटलांचा सेवक म्हणून लोकप्रतिनिधीला फोन लावून प्रश्न विचारणे हाच माझा गुन्हा आहे का? असा आर्त सवाल भगवान येवले यांनी उपस्थित केला आहे. आता या संपूर्ण लोकशाहीप्रधान अत्याचाराविरोधात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे न्यायाची याचना केली आहे. उद्या जर माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाले, तर त्याला सर्वस्वी नांदेडचे स्वयंभू नेते हेमंत पाटील हेच जबाबदार राहतील, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. नवा न्याय अन् लोकशाहीचा बळी एकंदरीत काय, तर शेतकऱ्याच्या पिकाला भाव मागायचा नाही, नेत्यांच्या वक्तव्यांवर प्रश्न विचारायचा नाही आणि चुकून विचारलाच तर पोलिसांच्या लाठ्या, शिव्या आणि कोरे बॉन्ड खाण्यासाठी तयार राहायचे, हाच आजचा नवा न्याय ठरत आहे! लोकप्रतिनिधी जर राजासारखे वागणार असतील आणि पोलीस त्यांचे गुलाम बनून काम करणार असतील, तर साध्या शेतकऱ्याने न्यायासाठी कोणाकडे पाहायचे? आता या शेतकरी पुत्राला सरकारकडून खरोखर न्याय मिळतो की नेत्यांची हीच दांडगाई पुढे सुरू राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल! कॉल रेकॉर्डिंग … आणि भगवान येवलेने व्हायरल केलेला व्हिडीओ .. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/10/Hemant-Patil-Shivogal-Prakaran-2.mp4 https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/10/Hemant-Patil-Shivogal-Prakaran-1.mp4 https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/10/Hemant-Patil-Shivogal-Prakaran-3.mp4 Kanthak Suryatal Post Views: 14 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळला; दोघांसह कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल