खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह; अनेक प्रश्न अनुत्तरित, पोलिसांच्या तपासाकडे लक्ष! माळकौठा (प्रतिनिधी) – शेतकऱ्याच्या गळ्यात कर्जाचा फास आणि फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह, अशी परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. माळकवठा तालुक्यातील ४० वर्षीय शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात (के एफ इंटरप्राजेस) पंख्याला लटकलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा आत्महत्येचा प्रकार आहे की यामागे काही वेगळे रहस्य दडले आहे, याचा उलगडा आता पोलिसांच्या तपासातूनच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शिंदे यांनी संबंधित खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जवसुलीसाठी गुरुवारी कंपनीचे कर्मचारी त्यांना माळकवठा येथून कार्यालयात घेऊन गेले होते. मात्र, शनिवारी त्यांचा मृतदेह त्याच कार्यालयात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. गुरुवारी कार्यालयात आणलेला शेतकरी शनिवारी मृतावस्थेत आढळतो, या दोन दिवसांत नेमके काय घडले, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कर्जवसुलीचा तगादा की प्रश्नांचा भडिमार? कर्ज दिले तेव्हा व्यवहाराचे गणित पक्के; पण कर्जदाराच्या मृत्यूची वेळ आली की जबाबदारीचे गणित कोण मांडणार? शेतकऱ्याच्या कर्जाचा हिशेब ठेवणाऱ्या व्यवस्थेकडे आता त्याच्या मृत्यूचा हिशेब मागण्याची वेळ आली आहे. शिंदे यांना कार्यालयात आणल्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते का? ते दोन दिवस कार्यालयातच होते का? त्यांच्यासोबत नेमके काय घडले? कार्यालयात त्यांना मृत्यूला सामोरे जाण्याची संधी कशी मिळाली? की त्यांचा मृत्यू अन्य कारणाने झाला आणि नंतर मृतदेह लटकवण्यात आला? हे प्रश्न आहेत; मात्र त्यांची उत्तरे तपासाआधी ठामपणे देणे म्हणजे निष्कर्षाचा फास आधीच आवळण्यासारखे ठरेल. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/10/KF-Interprijes-1.mp4 चार मुलांचे भविष्य आणि तपासाची कसोटी! चंद्रकांत शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबाच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना, मृत्यूमागील सत्य बाहेर येणे हीच त्यांच्यासाठी सर्वांत मोठी अपेक्षा आहे. घटनेची माहिती मिळताच वजिराबादचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता वजिराबाद पोलिसांसमोर खरी कसोटी आहे. सीसीटीव्ही चित्रण, कार्यालयातील उपस्थितीची नोंद, संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब आणि शवविच्छेदन अहवाल यांतून सत्य बाहेर येणे आवश्यक आहे. कारण प्रश्न साधा आहे; पण गंभीर आहे,कर्जाच्या वसुलीसाठी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला? आत्महत्या, अपघात की घातपात? उत्तर पोलिसांच्या तपासातूनच मिळेल. तोपर्यंत संशयाचे ढग दूर करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर आहे. अन्यथा, कर्जाच्या आकड्यांत हरवलेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूभोवती अनुत्तरित प्रश्नांचाच फास अधिक घट्ट होत राहील. Kanthak Suryatal Post Views: 68 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचा एल्गार! १ नोव्हेंबरची रॅली रोखण्यासाठी दिल्लीत राजकीय डर्टी गेम सुरू?