सचखंड श्री हजूर साहिब येथे शस्त्रपूजा; शहरात विविध ठिकाणी रावण दहन, शोभायात्रा आणि धार्मिक कार्यक्रम

नांदेड (प्रतिनिधी) – अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी (दसरा) आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दसऱ्याच्या पारंपरिक पूजेसह शीख धर्मातील हल्ला मोहल्ला मिरवणूक, सचखंड श्री हजूर साहिब येथील धार्मिक विधी, भगवान बालाजींची रथयात्रा, कृष्ण पालखी आणि विविध बुद्धविहारांमधील धम्मवंदना अशा विविध कार्यक्रमांनी शहरात सणांचा उत्साह द्विगुणित झाला.

दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळपासूनच सचखंड श्री हजूर साहिब येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांनी लांबच लांब रांगेत उभे राहून श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. घरोघरी दसऱ्याची पूजा करण्यात आली. सचखंड श्री हजूर साहिब येथे शस्त्रपूजेला विशेष महत्त्व असल्याने यानिमित्ताने पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजाही करण्यात आली.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला मोहल्ला मिरवणुकीला सुरुवात झाली. बोले सो निहाल, सत श्री अकाल च्या जयघोषात ही मिरवणूक महावीर चौक आणि तहसील मार्गावरून मार्गक्रमण करत पुढे गेली. मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

शहरातील राम मंदिर,गाडीपुरा बालाजी मंदिर तसेच मुख्य रस्त्यावरील बालाजी मंदिर येथून भगवान गोविंदाच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आलेल्या या रथयात्रांनी शहरातील धार्मिक उत्साहात भर घातली.

दसऱ्यानिमित्त गाडीपुरा मैदान आणि सिडको परिसरात रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा आनंद घेतला. शहरातून श्रीकृष्णाची पालखी शमीपूजन व शमीदर्शनासाठी पारंपरिक मार्गाने निघाली. वाद्यांच्या गजरात निघालेल्या या पालखीनेही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रेल्वेस्थानकापलीकडील गोरक्षण परिसरात पालखी गेल्यानंतर अनेक ठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील विविध बुद्धविहारांमध्ये अर्चना व धम्मवंदनेचे कार्यक्रम पार पडले. नागरिकांनी बुद्धविहारांमध्ये उपस्थित राहून या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. घरोघरी आनंदाचे वातावरण होते. नागरिकांनी एकमेकांना दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत सण साजरा केला.

पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

शहरात एकाच दिवशी विविध धार्मिक मिरवणुका आणि कार्यक्रम होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवून कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी प्रयत्न केले. मिरवणुकीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही पोलिसांसोबत उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि हल्ला मोहल्ला या विविध परंपरांचा संगम साधणाऱ्या कार्यक्रमांमुळे नांदेड शहरात दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!