नांदेड- विद्यार्थ्यांच्या भौगोलिक ज्ञानात भर पडावी, त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रभेटीच्या माध्यमातून भौगोलिक संकल्पना समजाव्यात तसेच भौगोलिक सर्वेक्षणाच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर येथे इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर भूगोल विभागाच्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक सहलीमध्ये महाविद्यालयातील एकूण ३० विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले . या सहलीसोबत या सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश रवंदे व प्रा.नामदेव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. भागवत पस्तापुरे, प्रा. अर्चना दोडे, प्रा. संध्या आढाव आणि प्रा. कविता बोधले उपस्थित होत्या. या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची भौगोलिक वैशिष्ट्ये, निर्मितीचा इतिहास, भौगोलिक रचना आणि पर्यावरणीय महत्त्व यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे भारतातील एक महत्त्वपूर्ण नैसर्गिक वैशिष्ट्य आहे. बेसॉल्ट खडकांमध्ये निर्माण झालेले हे सरोवर भूगर्भशास्त्र, भूआकृतिशास्त्र आणि पर्यावरणीय अभ्यासाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. सरोवराची निर्मिती, त्याचा परिसर, सभोवतालची भूरचना, जलवैशिष्ट्ये आणि जैवविविधता यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला. तसेच सरोवराचा ऐतिहासिक वारसा, परिसरातील प्राचीन मंदिरे आणि सांस्कृतिक महत्त्व यांची माहितीही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. या प्रत्यक्ष निरीक्षणामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील भौगोलिक संकल्पना आणि प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थिती यांचा संबंध समजून घेण्यास मदत झाली. डम्पी लेव्हलच्या साहाय्याने जमिनीवरील विविध बिंदूंची सापेक्ष उंची निश्चित करणे, उंचीतील फरक मोजणे आणि भूपृष्ठाच्या उताराचा अभ्यास करणे यांसंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे अबनी लेव्हलच्या साहाय्याने उन्नत किंवा अवनत कोनांचे मापन करून भूपृष्ठाच्या स्वरूपाचा अभ्यास कसा करता येतो, याची माहिती देण्यात आली. या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची ओळख झाली. तसेच उपकरणांचा योग्य वापर, निरीक्षण नोंदविण्याची पद्धत, क्षेत्रीय मापनाचे महत्त्व आणि प्रत्यक्ष भौगोलिक संशोधनामध्ये सर्वेक्षण तंत्रांचा उपयोग यांविषयी त्यांचे ज्ञान अधिक दृढ झाले. ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरली. Kanthak Suryatal Post Views: 21 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पीपल्स कॉलेजच्या अर्थकट्टा मध्ये यूपीआय आणि एमडीआरवर विचारमंथन व्यक्तिमत्त्व विकास, वैचारिक समृद्धीसह योग्य परिवर्तन घडवण्यासाठी वाचन गरजेचे – निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल