जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाची मोहीम; 9 हजार 600 रुपयांचा दंड वसूल; तंबाखूमुक्त नांदेडसाठी नागरिकांनी सहकार्य करावे नांदेड (जिमाका) – माहूर शहर व परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याच्या तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम, 2003 (कोटपा) कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने मंगळवार, दि. 13 ऑक्टोबर 2026 रोजी धडक मोहीम राबविली. या मोहिमेत विविध ठिकाणी अचानक तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 23 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 9 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे आणि नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. संजीवनी जाधव, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, समुपदेशक किरण चिरडे आणि एमजीव्हीएसचे मंगेश गायकवाड यांचा समावेश होता. या मोहिमेसाठी माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सत्यपाल मडावी आणि होमगार्ड शेख असलम यांनी सहकार्य केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे, कायद्याच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सेवन किंवा साठवण होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी जिल्हा रुग्णालय, नांदेड येथील जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाकडे तक्रार नोंदवावी. तंबाखू नियंत्रण कायद्याचे पालन करून नांदेड जिल्हा तंबाखूमुक्त करण्याच्या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 32 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इंदिरा गांधी महाविद्यालयात भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन