Oplus_16908288

‘काजू-बदाम काय आम्ही आणून ठेवले का?’; छोट्या गोष्टीचे एवढे मोठे भांडवल कशाला?

नांदेड (प्रतिनिधी):- दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत काजू-बदामाची मेजवानी सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या बैठकीदरम्यान खासदार बंडू जाधव काजू-बदाम खात असल्याचे दृश्य माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरले. याबाबत माध्यमांनी सवाल केला असता खासदार जाधव यांनी माध्यमांवरच संताप व्यक्त करत, ‘काजू-बदाम काय आम्ही आणून ठेवले का?’ असा सवाल केला.

 

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि शासनाकडून अपेक्षित मदतीवर चर्चा होणे अपेक्षित असताना बैठकीतील काजू-बदामाच्या चर्चेने वेगळेच वळण घेतले. बैठकीतील काजू-बदाम खातानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर माध्यमांनी या मुद्द्यावर खासदार जाधव यांना प्रश्न विचारला.

 

यावेळी जाधव यांनी ‘छोट्या गोष्टीचे एवढे मोठे भांडवल करण्याची गरज नाही,’ असे सांगत माध्यमांच्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त केली. मात्र, दुष्काळाच्या बैठकीतील या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा बैठकीतील पाहुणचाराचीच चर्चा रंगली आहे.

 

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकारावर केलेल्या प्रतिक्रियेबाबतही खासदार जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. ‘अंबादास दानवे आपल्या घरी काजू-बदाम खात नाहीत का?’ असा सवाल करत त्यांनी दानवे यांच्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 

दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना लोकप्रतिनिधींच्या बैठकीतील खाण्यापिण्याच्या मुद्द्यामुळे मात्र राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला शेतकरी पिकांचे नुकसान, कर्जाचा वाढता बोजा आणि पाण्याच्या प्रश्नाने त्रस्त असताना दुसऱ्या बाजूला दुष्काळी बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडिओ चर्चेत आल्याने लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘काजू-बदाम कोणी आणले?’ यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ‘छोटी गोष्ट’ म्हणून झटकून न लावता दुष्काळग्रस्तांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उत्तर देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित व्हिडिओ…

संबंधित बातमी…

दुष्काळी बैठकीत काजू-बदामाची मेजवानी; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, लोकप्रतिनिधींच्या तोंडात चव!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!