८ जिल्ह्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत नेत्यांची ड्रायफ्रूट्सवर मेजवानी; शेतकरी उघड्यावर, तर लोकप्रतिनिधी वातानुकूलित कक्षात धुंद! दुष्काळाच्या झळा अन् काजू-बदामाची चव; नांदेडमधील बैठकीने उघड केले नेत्यांचे वास्तव! नांदेड (खास प्रतिनिधी) – नांदेड येथील वातानुकूलित नियोजन भवनाच्या थंडगार कक्षात पार पडलेल्या एका तथाकथित आढावा बैठकीने महाराष्ट्रातील भीषण आणि विदारक वास्तवावर पुन्हा एकदा तीव्र प्रकाश टाकला आहे. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या दाढेत सापडून पार उद्ध्वस्त झालेला असताना, जनतेच्या पैशावर जगणाऱ्या नेत्यांना मात्र या परिस्थितीच्या गांभीर्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे या बैठकीत उघड झाले आहे. नांदेडमधील एसी कक्षात बसून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुरुवातीला पुष्पगुच्छ आणि सत्कार स्वीकारण्यास नकार देऊन स्वतःचा साधेपणा दाखवण्याचा सुंदर देखावा उभा केला. परंतु, अवघ्या काही मिनिटांतच आठ जिल्ह्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत या नेत्यांचा आणि त्यांच्या सोबत्यांचा खरा मुखवटा गळून पडला. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील आणि विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने पूर्णपणे कंटाळला असून, शेतातील संपूर्ण पिके समाप्त झाली आहेत. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत, आठ जिल्ह्यांतील सर्वोच्च नेतेमंडळी एकत्र येऊन दुष्काळावर काय उपाययोजना करायच्या, याची चर्चा करण्यासाठी जमली होती. परंतु, ही बैठक म्हणजे दुष्काळावर तोडगा काढण्याचे माध्यम न ठरता नेत्यांच्या चोचल्यांची मेजवानी ठरली. एसीच्या गारव्यात बसून हे सर्वोच्च नेते आणि लोकप्रतिनिधी काजू, बदाम आणि किसमिससारख्या महागड्या ड्रायफ्रूट्सवर मस्त ताव मारत दुष्काळाची आणि काळाची चर्चा करत होते. बळीराजाच्या घरात चुलीत पेटवायला सरपण उरलेले नसताना, हे नेतेमंडळी तोंडात ड्रायफ्रूट्स भरून शेतकऱ्यांच्या आक्रोशावर भाष्य करत होते, ही या राज्याची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, निसर्गाने त्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा वेळी शासनाकडून त्यांना २०२४-२५ च्या हंगामासाठी नवीन विमा रक्कम देण्याचे पोकळ आश्वासन दिले जात आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांना जुनाच हक्काचा विमा मिळालेला नाही, त्यांना हे सरकार नवीन काय देणार? असा संतप्त सवाल बळीराजा विचारत आहे. जुनी मदत थकीत ठेवायची आणि नवीन विम्याच्या रकमेचे गाजर दाखवायचे, या बेफिकीर धोरणामुळे शेतकऱ्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. अशा प्रसंगी शेतकरी अश्रू ढाळत असताना, एसी हॉलमध्ये बसून ड्रायफ्रूट्स चाबणाऱ्या या निगरगट्ट नेत्यांना शेतकऱ्यांच्या संसाराची पुसटशी तरी जाणीव आहे का? आठ जिल्ह्यांतील सर्वोच्च नेते जर अशा प्रकारे दुष्काळाच्या बैठकांमध्ये काजू-बदामावर ताव मारत चर्चा करणार असतील, तर या महाराष्ट्राचे आणि या देशाचे कधी भले होणार का? असा अत्यंत जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे. खरं तर, अशी भ्रामक आणि देखाव्याची दुष्काळ चर्चा घडवून आणण्यापेक्षा ती न घडवलेलीच शंभर पटीने बरी होती. कारण या बैठकांमधून हतबल शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही, उलट जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांवर नेत्यांची मेजवानी मात्र थाटात पार पडते. हे नेते स्वतःला जनता आणि शेतकऱ्यांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणवून घेतात, परंतु प्रत्यक्षात मात्र जनतेचे म्हणणे ऐकून घेण्याची किंवा त्यांच्या वेदना समजून घेण्याची साधी मानसिकताही त्यांच्यात उरलेली नाही. जनतेने निवडून दिलेले हे प्रतिनिधी आज संपूर्णपणे आत्मकेंद्रित झाले आहेत. त्यांच्या मनात जे येते, तेच ते करतात; सामान्य जनतेचा किंवा राबणाऱ्या शेतकऱ्याचा आवाज त्यांच्या बंद दरवाजांपर्यंत कधीच पोहोचत नाही. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जनतेचे आणि पीक वाया गेल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे आता काय होणार, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. स्वतःला लोकसेवक म्हणवणारे नेते जेव्हा काजू-बदामाच्या चवीत गुंग होऊन दुष्काळाची थट्टा मांडतात, तेव्हा या हतबल जनतेने आणि बळीराजाने आता नक्की काय करावे? शेवटी आपल्या हताश नशिबाला दोष देत देवाचे गाणे गाण्याशिवाय या असहाय्य जनतेच्या हाती काहीही उरलेले नाही, हेच अंतिम आणि क्लेशदायक सत्य आहे. Kanthak Suryatal Post Views: 63 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दुष्काळी बैठकीत काजू-बदामाची मेजवानी; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, लोकप्रतिनिधींच्या तोंडात चव!